मोठी दुर्घटना टळली, नागरिकांचा संताप
शहरातील प्रमुख बाजारपेठेचा परिसर असलेल्या सीताबर्डीतील मुंजे चौकातील मेट्रो बांधकामस्थळावरील सिमेंट पिल्लरसाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सांगाडा ऐन वर्दळीच्या वेळी कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेळीच सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
सीताबर्डीतील मुंजे चौकात मेट्रोचे मध्यवर्ती स्थानक व इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मुळातच अरुंद असलेल्या येथील रस्त्यावर या कामामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. बाजारपेठेचा परिसर आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे दिवसभर गर्दी असते. अशातच आज दुपारी चार वाजताच्या सुमारास वरील घटना घडली. मेट्रो मार्गासाठी सिमेंट पिल्लर उभारण्यात येत आहे. त्यासाठी येथे उंच लोखंडी सांगाडे उभे करण्यात आले आहे. त्याला आधार देण्यासाठी सेंट्रिंगचे काम सुरू असताना अचानक ‘हायड्रो’ यंत्राचा त्याला धक्का लागला. त्यामुळे सांगाडा एकाबाजूने झुकला. त्याला क्रेनच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न तातडीने करण्यात आला. मात्र, वजन अधिक असल्याने ते शक्य झाले नाही. त्याची खाली येण्याची गती कमी झाली. हळूहळू तो रस्त्यावर आडवा कोसळला. या दरम्यान सांगाडा झुकू लागल्याचे कळताच रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व अपघाताची कारणे शोधण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
बर्डीवर वाहतूक कोंडी
दरम्यान, रस्त्यावर भीमकाय लोखंडी सांगाडा कोसळल्याने बर्डीतील वाहतूक चार तासापेक्षा अधिक काळ ठप्प होती. रस्त्यावर आडव्या पडलेल्या लोखंडी सळ्या कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या अपघातानंतर एक तास वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. कालांतराने सहा वाजताच्या सुमारास तो पूर्ववत करण्यात आला.
चौकशीचे आदेश
कंत्राटदाराने आवश्यक ती काळजी न घेतल्याने ही घटना घडली आहे. त्याची चौकशी करण्याचे आदेश महामेट्रो प्रशासनाने दिले आहे. प्राथमिकदृष्टय़ा हायड्रो यंत्रचालकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास येत असून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे, असे अनिल कोकाटे यांनी सांगितले.
नागरिक संतप्त
वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांनी या घटनेमुळे त्यांचा संताप बांधकामस्थळी उभ्या असलेल्या क्रेनच्या काचा फोडून व्यक्त केल्या. दोन क्रेनच्या काचा फोडण्यात आल्या.
नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
संपूर्ण शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. बांधकामस्थळी येणाऱ्या जड वाहनांमुळे यापूर्वी अपघात झाले आहेत. सेंट्रल अॅव्हेन्यूवर पिल्लरचा एक तुकडा दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर कोसळला होता. आता बर्डीत लोखंडी सांगाडा कोसळला आहे. त्यामुळे मेट्रोच्या बांधकामस्थळी नागरिकांच्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाही हे स्पष्ट झाले आहे. वर्धा मार्गावरही रात्री केव्हाही एक रस्ता बंद केला जातो. त्याचा फटका नागरिकांना बसतो. बर्डी ते शंकरनगर मार्गावरही अशीच अवस्था आहे. महामेट्रो प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नाही.