नागपूर : भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर आंबेडकरी समाजातील एक नवीन वादाचा विषय समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केली होती. सरन्यायाधीश भूषण गवई हे आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालले नाहीत, हे सत्य आहे. त्यांचे वडील रा.सू. गवई यांनी आंबेडकरवादी चळवळ विकून खाण्याचे काम केले, तर न्यायाधीश गवई यांनी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा कायदा आणला, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेले सरन्यायाधीश भूषण गवई यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यामुळे नव्या चर्चेला पेव फुटले आहे. या भेटीमागे काय दडले आहे ते पहा…
न्यायव्यवस्थेत वंचित घटकांचे प्रतिनिधित्व वाढवणारी ऐतिहासिक पायरी म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती देशभरात स्वागतार्ह मानली जाते. समाजाच्या तळागाळातून आलेल्या गवई यांनी घटनात्मक तत्त्वांचे रक्षण आणि सामाजिक न्यायाची कास धरण्याची सातत्यपूर्ण भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर जयदीप कवाडे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, अशी माहिती प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या भेटीत सरन्यायाधीश गवई व जयदीप कवाडे यांच्यात न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा, ग्रामीण भागात न्यायाची सहज उपलब्धता तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण या विषयांवर सखोल चर्चा झाली. हा संवाद केवळ तात्कालिक मुद्यांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील धोरणात्मक दृष्टीकोनाचा मार्गही दाखवणारा ठरला. जयदीप कवाडे यांनी या निमित्ताने भूषण गवई यांच्या कार्यकिर्दीतील सत्यनिष्ठा, न्यायदानातील निष्पक्षता आणि वंचित घटकांबद्दलची संवेदनशीलता यांचा विशेष गौरव केला. गवई यांचे मार्गदर्शन हे केवळ न्यायालयापुरते मर्यादित नसून, समाजाच्या सर्व स्तरांवर सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, असे कवाडे यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत कुणाला सोडलंय?
आंबेडकर यांच्या टीकेला भूषण गवई यांचे बंधू आणि रिपाई गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिले. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने देशात आनंद आहे. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे आदी नेत्यांचे फोन आले. त्यांचा सत्कार करायचा असल्याचे सांगितले. पण ते प्रोटोकॉलमध्ये बसते की नाही, ते माहिती नाही. परंतु गट-तट विसरून सर्वांनी फोन केले. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत कुणाला सोडलंय? यांनी आठवलेंना सोडलं नाही, यांनी सविता माईसाहेब आंबेडकरांना सोडले नाही. त्यामुळे आंबेडकर पित्रा-पुत्राकडे दुर्लक्ष करा, असे राजेंद्र गवई म्हणाले.