नागपूर : खाकी वर्दीतील दाम्पत्याच्या दुभंगलेल्या मनात खाकी वर्दीनेच पेरला आनंद|the khaki uniform sowed happiness in the divided hearts of the couple in khaki uniform bharosa sail police nagpur | Loksatta

नागपूर: खाकी वर्दीतील दाम्पत्याच्या दुभंगलेल्या मनात खाकी वर्दीनेच पेरला आनंद

एका क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात त्याने संजनाला मारहाण केली. त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन ती माहेरी निघून गेली.

the khaki uniform sowed happiness in the divided hearts of the couple in khaki uniform bharosa sail police nagpur
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

पोलीस विभागात कर्तव्य बजावताना दोघांची नजरानजर झाली. दोघांत प्रेमांकुर फुलला आणि लगेच विवाह बंधनात अडकले. मात्र, एका क्षुल्लक कारणावरून दोघांत वाद झाल्याने दुरावा निर्माण झाला. तो वाद भरोसा सेलपर्यंत पोहचला. भरोसा सेलने दुभंगलेल्या वर्दीतील दोन्ही मने जुळवून त्यांच्या जीवनात आनंद पेरला.संजय आणि संजना ( काल्पनिक नाव) हे दोघेही पोलीस दलात भरती झाले. संजना अमरावतीची तर संजय नागपुरातील. दोघेही पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असताना दोघांची ओळख झाली. साधीभोळी असलेल्या संजनाशी त्याने मैत्री केली.

दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांची काळजी घ्यायला लागले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. संजयने आपल्या आईवडिलांशी चर्चा केली आणि परवानगी मिळवली. मात्र, संजनाच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. संजनाने कुटुंबीयांची समजूत घालून संजयला भेटायला घरी आणले. संजयचा स्वभाव बघून संजनाच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नास होकार दिला. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. गेल्या दीड वर्षापूर्वी धुमधडाक्यात लग्न पार पाडले. दोघेही वर्दीवर रुबाबात नोकरी करून संसार सांभाळायला लागले. त्यांची नेटका संसार सुरू झाला. त्यांच्या संसारवेलीवर गेल्या तीन महिन्यांपूर्वी गोंडस फूल उमलले. त्यामुळे घरातील वातावरणात आनंद मावेनासा झाला. दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाला पारावार उरला नाही. मोठ्या थाटात बाळाचे नामकरण झाले आणि परिपूर्ण कुटुंब म्हणून ओळख निर्माण झाली.

हेही वाचा: समृध्दी महामार्गाच्या पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती

संजय आणि संजनाच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. एका क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात त्याने संजनाला मारहाण केली. त्यामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन ती माहेरी निघून गेली. कुटुंबाने टोकाची भूमिका घेतली तर संजनानेही पतीकडे न जाण्याचा निर्णय घेतला. पती-पत्नीत विसंवाद निर्माण झाल्याने दोघांत काही दिवसांपासून अबोला होता. संसार तुटण्याच्या मार्गावर होता.

हेही वाचा: उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’वर दहाफूट उंच सुरक्षा भिंत बांधणार

बाळापासून दूर झालेल्या पित्याचा जीव कासाविस होत होता. परंतु, दोघांचाही वाद विकोपाला गेल्यानंतर ताटातूट होण्याची वेळ आली. तत्पूर्वी दोघेही भरोसा सेलमध्ये समुपदेशनासाठी आले. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दोघांच्याही मनातील दुरावा ओळखला. शेवटी दोन्ही खाकी वर्दीतील दुरावा दूर करण्यासाठी खाकी धावून आली. दोघांचेही समुपदेशन करून नव्याने संसार फुलवण्यास मदत केली. दोघेही हातात हात घालून घरी परतले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 09:34 IST
Next Story
मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे उपमुख्यमंत्र्यांकडून सारथ्य; समृद्धी महामार्गाची शिर्डीपर्यंत पाहणी