बुलढाणा : गाय चोरीच्या संशयावरून दलित युवकास कथित गोरक्षकांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या खामगावमधील दैनंदिन व्यवहार, लाखोंची उलाढाल यावर गंभीर परिणाम झाला.
विविध आंबेडकरी पक्ष संघटना, वंचित बहुजन आघाडी, सामाजिक संघटना यांच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिक, लघु व्यावसायिक आणि व्यापारी यांची अडचण लक्षात घेता दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वा.दरम्यान मर्यादित बंद पाळण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार या पूर्वघोषित वेळेतच बंद पाळण्यात आला. यानंतर संध्याकाळी दैनंदिन व्यवहार व व्यापार पूर्ववत सुरू झाले. मात्र दुपारी १२ ते ४ दरम्यान कडकडीत बंद पहावयास मिळाला.
खामगाव शहरातील मुख्य मार्ग, गांधी चौक, आठवडी बाजार परिसर, सरकी बाजार, भुसावळ चौक, मस्तान चौक, घाटपुरी नाका, नांदुरा मार्ग, फरशी परिसर मध्ये कडकडीत बंद दिसून आला. लहान मोठी दुकानें, सरांफा, व्यावसायिक प्रतिष्ठान सर्व बंद होती.
खामगाव येथे एका दलित युवकाला गाय चोरीत सहभागी असंल्याच्या कारणावरून बेदम दोनदा मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटना आक्रमक झाल्या असून विविध दलित संघटनांनी खामगाव बंदच आवाहन केले होते.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, आंबेडकरी नेते जयदीप कवाडे यांनी मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या रोहन पैठणकर याची अकोला येथील रुग्णालयात भेट घेऊन नंतर खामगांव शहर गाठले. तपास अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेऊन जखमी युवकाला न्याय देऊन आरोपीविरुद्ध मोक्कानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
या दलित युवकाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी खामगाव शहर बंदची हाक देण्यात आली. बंददरम्यान पोलीस विभागाने शहरात कडक बंदोबस्त ठेवला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी (खामगाव) प्रदीप पाटील बंदवर नजर ठेवून होते.
काय आहे प्रकरण?
तीन कथित गोरक्षकांनी गाई चोरीच्या संशयावरून एका मध्यरात्री दलित युवकास दगड व लाता बुक्क्यानी दोनदा बेदम मारहाण करून त्याला रक्तबंबाळ केले. सुदैवाने दुसऱ्यांदा मारहाण होत असताना शिवाजी नगर पोलिसांची रात्र गस्तीचे वाहन घटनास्थळी पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. याप्रकरणी तिघा युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. रोहन संतोष पैठणकर (२१, रा. शामल नगर, शेगाव रोड, खामगाव, जिल्हा बुलढाणा) असे अमानुष मारहाण करण्यात आलेल्या दलित युवकाचे नाव आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो.
घटनेप्रसंगी रोहन हा रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खामगाव बसस्थानकजवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी त्याला खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून आपल्या जवळील वाहनाने जवळच असलेल्या मैदानात नेले. यावेळी या त्याला हाता पायांनी व दगडाने अमानुष मारहाण केली. त्याचे कपडे फाडले. त्याच्या अंगावर मोकाट गाया सोडून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.यानंतर त्याला खामगाव मधीलच घाटपुरी नाका परिसरातील दंडेस्वामी मंदिर परिसरात नेण्यात आले. तिथे आणखी एक युवक आला. या तिघानी रोहन ला पुन्हा क्रूर पणे मारहाण केली. यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आपण गाई चोर नसल्याचे विनवणी करून सांगत असताना देखील त्याला मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी गब्बू गुजरिवाल (रा. सजनपुरी, खामगाव), प्रशांत गोपाल संगेले (गांधी ले आऊट, खामगाव) आणि रोहित पगारिया (बालाजी प्लॉट, खामगाव) यांच्या विरुद्ध ॲस्ट्रोसिटीसह विविध कसलमांनुसार गुन्हे दाखल केले.