नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील नांदणी मठातून ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ या हत्तिणीला राधेकृष्ण ट्रस्टच्या जामनगर येथील ‘वनतारा’ येथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या प्रकरणात ‘पेटा इंडिया’ या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
केरळ, कनार्टक या राज्यातील देवस्थानात हत्ती आहेत. मात्र, ‘पेटा इंडिया’ने महाराष्ट्रातील हत्तींवरच लक्ष केंद्रित केले आहे. ज्योतिबाच्या सेवेसाठी वारणा उद्योग समूहाने मंदिर संस्थानला ‘सुंदर’ हत्ती भेट दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या हत्तीच्या आरोग्याची हेळसांड हाेत असल्याची तक्रार ‘पेटा इंडिया’ने केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जून २०१४ मध्ये या हत्तीला कर्नाटकातील बाणेरगठ्ठा येथे पाठवले आणि काही वर्षांतच सुंदर हत्तीचा मृत्यू झाला. याच घटनेची पुनरावृत्ती आता झाली आहे. ‘वनतारा’ला हत्ती हवे आहेत म्हणून या संस्थेनेही हत्तींवरच लक्ष्य केंद्रित केल्याची टीका होत आहे.
या प्रकरणात ‘पेटा इंडिया’ची भूमिका पटण्यासारखी नाही. कारण इतक्या वर्षांपासून ‘महादेवी’ नांदणी मठात आहे. तिच्या आरोग्याबाबत तक्रारी होत्या, तर त्याच ठिकाणी तिची चांगली देखरेख करता आली असती. एक संस्था म्हणते म्हणून मूळ अधिवासातून बाहेर नेणे योग्य नाही. त्या मठातील हत्तीशी संबंधित कमतरता दूर करणे ही शेवटी सरकारचीसुद्धा जबाबदारी आहे. यापूर्वी राज्यातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमधून सर्व हत्ती ‘वनतारा’ येथे नेण्याचा प्रयत्न झाला होता. – दत्ता शिर्के, अध्यक्ष, जनसंघर्ष समिती
‘ती चांगल्या वातावरणात राहावी, हीच इच्छा’
आम्ही आताच नाही तर खूप वर्षांपासून ‘महादेवी’ हत्तीच्या आरोग्याबाबत हेळसांड होत असल्याचे बघतोय. प्रत्यक्षात या हत्तीच्या व्यावसायिक वापराबरोबरच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तिला सातत्याने नेले जात होते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ती आजारी होती. वनविभागाच्या समितीने पाहणी केल्यानंतर त्यांनीही तोच अहवाल दिला.
मठाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. ‘महादेवी’ला ‘वनतारा’ला पाठवण्याचा सल्ला आमचा नव्हता. आम्ही फक्त ती चांगल्या वातावरणात राहावी, एवढीच आमची भूमिका होती. ‘वनतारा’ला पाठवण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीचा होता, असे पेटा इंडियाच्या डायरेक्टर ऑफ ॲडव्होकेसी खुशबू गुप्ता यांनी सांगितले.
‘पेटा इंडिया’ने हा आरोप फेटाळला आहे. आम्ही फक्त हत्तीची हयगय होत असल्याची तक्रार केली. तो हत्ती कुठे पाठवायचा हा निर्णय आम्ही घेत नाही. महाराष्ट्रात हत्तीसाठी रुग्णालय नाही. ‘वनतारा’मध्ये ती व्यवस्था आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने त्याठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला, असे ‘पेटा इंडिया’चे म्हणणे आहे.