अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी अडचणीत

नागपूर/अमरावती : विदर्भात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ७० हजारहून अधिक हेक्टवरील रब्बी पिकांना फटका  बसला. काही ठिकाणी संत्री गळाली तर काही ठिकाणी खरेदी केंद्रावरील धान ओला झाला.  फळबागा व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्याला गारपिटीचा  अधिक फटका बसला. येथे सुमारे पंचवीस ते तीस हजार हेक्टरवर पीक हानी झाल्याचा कृषी व महसूल खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक आर.जे. भोसले यांनी सांगितले. गारपीट व पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्याला बसला. येथे सलग दोन दिवस गारपीट झाली. लाखांदूर, साकोली या भागात पावसामुळे टोमॅटो, लाखोळी, उडीद, मूगमळणी झालेला धान ओला झाला. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, कोरची, देसाईगंज या भागात हरभरा, वाटाणा, लाख पिकांना फटका बसला असून, गोंदिया जिल्ह्यात खरेदी केंद्रावर विकण्यासाठी आणलेला धान ओला झाला. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात काटोल, नरखेड व भिवापूर तालुक्याला फटका बसला.

पश्चिम विदर्भात मोठी हानी

अमरावती : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सुमारे ४९ हजार हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झाले. या भागात सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला (२५ हजार ९५० हेक्टर) बसला आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हा ( ९ हजार ८० हेक्टर) अमरावती जिल्हा (७ हजार ६२२ हेक्टर), बुलढाणा जिल्हा (३ हजार ६९७), वाशीम (३ हजार ८५) क्रम लागतो. पावसामुळे  तूर, गहू, हरभरा, हळद आणि कांदा पिकांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत संत्र्याच्या झाडांच्या पानांची गळती झाली आहे.

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल.

विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसनमंत्री

अमरावती विभागात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४९ हजार ४३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून संकलित माहिती आणि नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला आह़े

शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग