अनिल कांबळे

नागपूर : कुख्यात ड्रग्स तस्कर आबू खानशी एक लाख रुपये व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या अब्दूल लतीफ शेखला सक्करदरा पोलिसांनी चौकशीसाठी गेल्या दोन दिवसांपासून  ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीची धसका घेतलेल्या लतीफचा बुधवारी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप  लतीफचे नातेवाईक करीत असून त्यानी वस्तीतील नागरिकांसह सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे सकाळी सक्करदरा आणि ताजबागमध्ये तणावाचे वातावरण होते.

अब्दूल लतीफ शेख हे  एका खासगी बँकेत नोकरी करीत होते. ते कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आबूशी संबंध असून त्यांनी फरार असताना एक लाख रुपयांची मदत केल्याचा आरोप पोलीस करीत होते. या संदर्भात सक्करदरा पोलीस, पोलीस उपायुक्त नूरुल हसन आणि सहायक पोलीस आयुक्त अब्दूल लतीफ यांची चौकशी करीत होते. गेल्या दोन दिवसांपासून सक्करदरा पोलीस लतीफ यांना सक्करदरा पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करीत होते. बुधवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत लतीफ शेख यांना सक्करदरा पोलिसांनी ठाण्यात बसून ठेवले आणि त्यांची चौकशी केली. त्यांना रात्री साडेदहा वाजता घरी जाण्याची परवानगी दिली. लतीफ हे घरी पोहचताच त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी नुसरत परवीन आणि भाऊ हफीस बालू शेख यांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. ताजबाग वस्तीतील शेकडो नागरिकांनी  गुरुवारी सकाळी दहा वाजता सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. या प्रकरणाची दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली असून स्वत: या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत.