जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक व इतर खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  लाखांदूर तालुक्यातील कूडेगाव शेत परिसरात गोसीखुर्द धरणाचा डावा कालवा फुटल्याने शेकडो हेक्टरमधील धान पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, अवघ्या आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा शेतात पेरलेली धान पीक  व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी खंडणी वसुलीचा डाव, दुकानासमोर ठेवला बनावट बॉम्ब

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील चौरस पट्ट्यात सिंचनाची सोय व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून डावा कालवा बांधण्यात आला. परंतु ,सदर बांधकाम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याने दरवर्षी डाव्या कालव्याचे पाणी खरीप पिकांमध्ये शिरून पिकांचे नुकसान होते. दरम्यान, १९ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील  कूडेगाव शेत परिसरात बांधकाम डावा कालवा फुटल्याने कालव्यात भरलेले पाणी शेकडो हेक्टरवरील धान  पिकात शिरले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील धान पीक  व इतर खरीप पिके पाण्यात बुडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा एकदा पुरामुळे शेकडो हेक्टरवरील धान पीक शेती व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

हेही वाचा >>> वर्धा : दोघांचे मृतदेह आढळले; एकाची आत्महत्या, तर दुसरा मासे पकडण्याच्या नादात गेला होता वाहून

शेकडो एकर शेतीमध्ये धान रोवणी झाली नाही…

गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामामुळे गेल्या जोरदार पावसात या कालव्याचे पाणी शेतात शिरले होते. प्रमोद गि-हेपुंजे, शामराव गि-हेपुंजे, नरेश ब्राह्मणकर, विलास ब्राह्मणकर, मनोहर ब्राह्मणकर व  कुडेगाव येथील काही शेतकऱ्यांनी या पाण्यामुळे त्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे कुजल्याचा आरोप केला आहे. मात्र, डाव्या कालव्याच्या पाण्याने धान  रोवणीसाठी पेरणी केलेले  पऱ्हे  कुजल्याने  कुडेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात धान रोवणीसाठी आवश्यक  पऱ्हे उपलब्ध नाहीत. या स्थितीत या गावातील शेकडो एकर शेतात धान रोवणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाचे दुर्लक्ष

गोसी खुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामामुळे चौरस परिसरातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. असे असताना दरवर्षी कालवा फुटण्याच्या भीतीने बाधित शेतकऱ्यांनीही कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, गोसी खुर्द धरणाच्या कालवा प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने दरवर्षी पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणी शासन व प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कालवा प्रशासनाच्या दुर्लक्षासह डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामामुळे पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.