नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्राणीसंग्रहालयात सातत्याने बाहेरील बिबट्यांचा शिरकाव वाढला आहे. या प्राणीसंग्रहालयातील बिबट्याच्या पिंजऱ्यात शिरुन ‘राणी’ नावाच्या मादी बिबट्याचा बळी घेतला. दोन वर्षापूर्वी ‘चांदणी’ नावाच्या मादी बिबट्याचा बळी घेतला होता. गोरेवाडा परिसरात मोठ्या संख्येत बिबट असून प्राणीसंग्रहालयाच्या स्थापनेपूर्वी अनेकांना या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे.

प्राणीसंग्रहालय तयार झाले तेव्हा प्राणी आणि पर्यटक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, गोरेवाडा व्यवस्थापनाचा हा दावा खोटा ठरला आहे. प्राणीसंग्रहालयाबाहेरील बिबट सातत्याने याठिकाणी प्रवेश करत आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्राणीसंग्रहालयाची धूरा सुरुवातीपासूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आली. त्यानंतर याच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्यात आले. मात्र, वन्यजीव व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे प्राणसंग्रहालयात सातत्याने अशा घटना घडत गेल्या.

या कंत्राटी कर्मचाऱ्याला प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिजऱ्याचा साधा दरवाजा देखील उघडता आला नाही आणि परिणामी या दरवाज्यात बिबट फसला. जानेवारी २०२३ मध्ये बाहेरुन आलेल्या बिबट्याने ‘चांदणी’ नावाच्या प्राणीसंग्रहालयातील मादी बिबट्याला मारले. त्यावेळी या बाहेरुन आलेल्या बिबट्याला जेरबंद करुन पेंचच्या जंगलात सोडण्यात आले. तर आता ‘राणी’ नावाच्या मादी बिबट्याला बाहेरच्या बिबट्याने मारले. याक्षणी प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात बाहेरच्या दोन बिबट्याने प्रवेश केल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन कंत्राटी आणि नंतर कायमस्वरुपी करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापक, अभिरक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे या प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन ढासळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेपासून येथे बाहेरचे बिबट प्रवेश करत आहेत. मात्र, महसूल कमावण्याच्या मागे लागलेल्या प्राणिसंग्रहालय प्रशासनाला येथील प्राण्यांच्या सुरक्षेविषयी काहीच देणेघेणे नाही. सातत्याने या प्राणिसंग्रहालयात बिबट येत असतानाही प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नाही. 

येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला ही बाब सांगितली. पण, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. अननुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आणि नंतर नियमित केलेल्यायाच्या हातात गोरेवाडा प्राणिसंग्रहालय सोपवल्यामुळे त्याची खूप मोठी किंमती येथील प्राण्यांना मोजावी लागत आहे. जंगलातील हा नर बिबटं प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात येत असतानाही प्रशासन सुस्त होते. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.