नागपूर : उपराजधानीपासून काही किलोमीटर अंतरावरील चिखली काजळी मार्गावर बाबाराव डोबले यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी मादी बिबट आपल्या तीन बछड्यांना घेऊन जाताना दिसली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. दरम्यान, मादी एका बछड्याला घेऊन गेली व दोन बछड्यांना त्याच ठिकाणी ठेवले. तुषार धारपुरे, सुनील टापरे, मंगेश बल्की व लोकेश डोंगरे हे शेतात जात असताना त्यांना बिबट मादी व तीन बछडे शेतात दिसले. याची माहिती सरपंच राजकुमार चोपडे यांना दिली.
गावात बातमी पसरताच अवघे गाव त्याठिकाणी गोळा झाले. या गोंधळामुळे बिबट्याचे दोन बछडे घाबरून नाल्यात लपून बसले. एका बछड्याला घेऊन मादी लांब पळाली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लगेच वनखात्याचे अधिकारी प्रवीण नाईक, अरुण मालके, अमोल मिलमिले, किशोर चव्हाण, तुकाराम राठोड, नीलेश तवले, मेघा धनोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे बचाव पथक देखील त्याठिकाणी पोहोचले.
केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी राजेश फुलसुंगे यांनी सहाय्यक वनसंरक्षक पांडुरंग पाखले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक, ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राचे समन्व्यक व राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास, उपवनसंरक्षक यांच्याकडून बिबट्याचे बछडे व आईचे पुनर्मिलन करण्याची परवानगी घेतली. त्या दोन बछड्यांना प्लास्टिक कॅरेटमध्ये त्याच जागी ठेवले. आजूबाजूला कॅमेरे लावले. सर्व सुरक्षेचा आढावा घेतला. गावकऱ्यांची गर्दी आधी होतीच पिल्लांना काही होऊ नये याकरिता कोंढाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी बरेच दूर राहून गस्ती करीत होते.
रात्री मादी बिबट आली व कॅरेट उलटून एक एक करून दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेली. या सर्व प्रकरणात श्री प्रवीण नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्री कुंदन हाते, समन्व्यक, ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर यांच्या मार्गदर्शनात सुधाकर मरस्कोल्ले, श्रीकृष्ण आसोले, बंडू मंगर, चेतन बारस्कर, स्वप्नील भुरे, किशोर चव्हाण, सुनील शिसोदे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या प्रकरणात लोकांच्या गर्दीमुळे बिबट आणि तिचे बछडे एकमेकांपासून दूरावले. पण त्याचवेळी हीच लोकांची गर्दी त्यांच्याच जिवावर देखील बेतू शकली असती. जर मादी बिबट्याने बछड्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर हल्ला केला असता. मात्र, वनखात्याने आणि ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने हे प्रकरण खूप संयमाने हाताळले आणि दुरावलेल्या बछड्यांना त्यांची आई मिळवून दिली.