राज्यातील वीस जिल्ह्य़ांतील चित्र

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक वर्षांत कुष्ठरोग नियंत्रणाचा प्रयत्न सुरू असला तरी शासनाचे चुकीचे धोरण व काही अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अद्याप या रोगावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यातील २० जिल्ह्य़ांमध्ये दर १ लाख लोकांमागे दहावर कुष्ठरुग्ण असल्याचे आरोग्य खात्याच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यात विदर्भातील १० जिल्ह्य़ांचा समावेश आहे. देशात मात्र दर लाखामागे १० हून कमी कुष्ठरुग्ण आढळतात, हे विशेष.

कुष्ठरोग हा जंतूमुळे होतो, याची १८७३ पर्यंत माहितीच नव्हती. १९४७ पर्यंत या आजारावर कुठलेही प्रभावी औषध नव्हते, परंतु १९८० मध्ये एमडीटी (मल्टी ड्रग थेरपी) या अत्यंत प्रभावी व आधुनिक औषधोपचारामुळे कुष्ठरोगाच्या स्थितीत महत्वाचे बदल झाले. या आजारावर नियंत्रणाकरिता भारतात १९८२-८३ पासून सुरुवात झाली. त्यासाठी सर्वप्रथम विदर्भातील वर्धा जिल्ह्य़ासह पश्चिम बंगालमधील पुरुलिया या दोन जिल्ह्य़ात कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे सुरू केला. त्यानंतर ही योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली. यासाठी दरवर्षी केंद्र व राज्य शासनाकडून कोटय़वधींचा खर्च केला जातो, त्यामुळे कुष्ठरुग्ण काही भागात कमी झाले असले तरी अद्याप यावर हवे त्या प्रमाणात नियंत्रण मिळालेले नाही. शासनाकडून राज्यातील २० जिल्ह्य़ात कुष्ठरुग्ण अधिक असल्याचे आरोग्य खात्याच्या नोंदीतून पुढे आले. त्यात चंद्रपूर, पालघर, गडचिरोली, भंडारा, धुळे, ठाणे, गोंदिया, नंदूरबार, जळगाव, रायगड, वर्धा, नागपूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती, वाशिम, परभणी, अकोला, नांदेड, मालेगाव, या २० जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्यातील चंद्रपूर, पालघर, गडचिरोली, भंडारा, धुळे, ठाणे, गोंदिया, नंदूरबार, जळगाव, रायगड, वर्धा, नागपूर (ग्रामीण) या जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे, दर लाखात वीसहून जास्त कुष्ठरुग्ण आढळल्याचे आरोग्य खात्याच्या अहवालात म्हटले आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे

  • अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिकट, लालसर कुठलाही डाग
  • त्वचेच्या रंगरूपात होणारे बदल
  • त्वचेला कोरडेपणा येतो व भेगा पडतात
  • संबंधित भागात बधिरता येते

कुष्ठरोग म्हणजे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरिअल लेप्रे या जंतूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. तो अनुवांशिक नसून त्याचा पाप-पुण्याशीही संबंध नाही, परंतु समाजात  आजही याबद्दल गैरसमज आहेत. ग्रामीण भाग व आदिवासी पाडय़ांसह अनेक भागात आजही कुष्ठरोगावरील उपचारासाठी पूजा-अर्चा, नवस फेडणे, जडीबुटी, मंत्र-तंत्राचा आधार घेतला जातो. हा प्रकार थांबवण्याची गरज असून योग्य उपचाराने हा आजार बरा होतो, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यातच उपचार न घेतलेल्या सांसर्गिक कुष्ठरुग्णाच्या जंतूचा प्रसार हवेतून होऊन आणखी रुग्ण वाढण्याचा धोका नाकारता येत नाही, अशी माहिती डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी दिली.