केंद्र सरकारच्या कोविन अ‍ॅपवरील माहिती

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : देशातील दोन राज्यांत करोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी दहा टक्केही नागरिकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण झाले नाही. तर या दोनसह दहा राज्यांत १५ टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांना दोन्ही मात्रा दिली गेली. केंद्र सरकारच्या कोविन अ‍ॅपवरील माहितीनुसार आरोग्य विभागाकडून जारी २७ जून २०२१ रोजीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यातील काहींची दुसरी लस घेण्याची वेळ आली तर काहींची यायची आहे. सहा राज्यांत २५ टक्क्यांहून अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्यात.

देशात २७ जून २०२१ पर्यंत २६ कोटी ५३ लाख ८४ हजार ५५९ नागरिकांना लसीची पहिली तर त्यातील ५ कोटी ६३ लाख ७५ हजार ५१८ नागरिकांनी दुसरीही मात्रा घेतली. त्यामुळे पहिली मात्रा घेतलेल्यांतील दुसरी मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण झालेल्यांचे प्रमाण २१.२४ टक्केच आहे. तर ‘दादर आणि नगर हवेली’ला ९.३० टक्के आणि दमन आणि दीव येथे ९.३८ टक्केच नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली.

१५ टक्केहून कमी दुसरी मात्रा घेतलेल्या राज्यांत या दोन राज्यांसह अंदमान आणि निकोबार बेट (११.३७ टक्के), गोवा (१४.४० टक्के), मध्य प्रदेश (१३.५० टक्के), मणिपूर (१३.७६ टक्के), मेघालय (१३.०३ टक्के), मिझोरम (१०.७० टक्के), नागालॅन्ड (१३.५८ टक्के), पुड्डूचेरी (१५.०८ टक्के) राज्यांचा समावेश आहे.

सहा राज्यांत २५ टक्केहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली. त्यात दिल्ली ३०.२० टक्के, गुजरात २७.५५ टक्के, केरळ २८.३३ टक्के, लद्दाख २८.०६ टक्के, त्रिपुरा ३०.२८ टक्के, पश्चिम बंगाल २८.९४ टक्के राज्यांच समावेश आहे. तर आंध्र प्रदेशात २४.३८ टक्के, अरुणाचल प्रदेश १७.२९ टक्के, आसाम २०.९० टक्के, बिहार १६.१० टक्के, चंदीगड १९.५४ टक्के, छत्तीसगड १९.३८ टक्के, हरयाना १८.१९ टक्के, हिमाचल प्रदेश १५.६७ टक्के, जम्मू आणि काश्मीर १७.५३ टक्के, झारखंड १८.२६ टक्के, कर्नाटक १९.५३ टक्के, महाराष्ट्र २३.८९ टक्के, पंजाब १६.१८ टक्के, राजस्थान १८.८० टक्के, तेलांगणा १६.६८ टक्के, उत्तर प्रदेश १६.५३ टक्के तर इतरही राज्यांत कमी-अधिक प्रमाणात दुसरी लस नागरिकांनी घेतली.

दरम्यान सर्वच राज्यांत लोकसंख्येच्या तुलनेत पहिली मात्रा घेतलेल्यांचीही संख्या कमीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात.

लसीकरणाची राज्यनिहाय स्थिती (२७ जून २०२१)

राज्य               पहिली मात्रा         दुसरी मात्रा

दिल्ली                 ५६,२९,४६४      १७,००,२०६

महाराष्ट्र           २,५०,४७३२७       ५९,८५,७०७

गुजरात           १,९३,३११२५        ५३,२६,३३०

बिहार             १,३५,०९४४९        २१,७५,२०९

मध्यप्रदेश       १,७४,४६५६७        २३,५६,८२७

राजस्थान         २,०१,९०७९०       ३७,९६,५३४

उत्तर प्रदेश       २,६१,३२२७२       ४३,२१,६५१

केंद्र सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध होताच झटपट लसीकरण राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांत केले जात असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळेच देशात दोन्ही लस दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मुबलक साठा मिळताच तातडीने राज्यात लसीकरण लवकर पूर्ण करण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे.

– दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी, पुणे.