स्थानांतरणाचा अडकलेला बेत पुन्हा मार्गी लावण्याच्या दृष्टीने हालचाली
प्राणिसंग्रहालयातील अंतर्गत प्रजनन वाघांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत असून तेथील जंगली प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पंजाबमध्ये जंगली प्रजातीच्या संवर्धनासाठी संग्रहालयात प्रजनन केंद्र सुरू केले आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचा प्रकल्प शहरात आकारास येत असून तेथे वाघांच्या प्रजनन केंद्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गोरेवाडा बचाव केंद्रातील वाघांसाठी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील दोन वाघिणींच्या स्थानांतरणाचा अडकलेला बेत पुन्हा मार्गी लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्राण्यांच्या जैविक गरजा आणि प्राणिसंग्रहालय मान्यता नियमानुसार प्राणिसंग्रहालयात नर व मादी वन्यप्राणी योग्य संख्येत ठेवणे आवश्यक आहे. माणसांच्या बाबतीत एकाच कुळात झालेले विवाह जसे ते कूळ नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरते, तीच बाब प्राण्यांच्या बाबतही लागू होते. प्राणिसंग्रहालयात जंगली प्रजाती मर्यादित संख्येत आहेत आणि म्हणूनच या प्रजातींच्या बचावासाठी अशी प्रजनन केंद्रे काळाची गरज ठरत आहेत. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात काही वर्षांपूर्वी या केंद्राचा विचार झाला होता, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. गोरेवाडा बचाव केंद्रात एक वाघ आल्यानंतर गोरेवाडा प्रशासनाकडून महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाला त्यांच्याकडे असलेल्या तीनपैकी दोन वाघिणींची मागणी करण्यात आली. काही अटी आणि शर्तीमध्ये स्थानांतरणात हा बेत अडकला. दरम्यान, गोरेवाडय़ात चंद्रपूर जिल्ह्य़ातून वाघीण आणल्यानंतर गोरेवाडा प्रशासनानेही महाराजबागेकडे वाघिणीची मागणी करणे थांबवले. मात्र, काही दिवसांपूर्वी महाराजबाग प्रशासनाकडूनच गोरेवाडा प्रशासनाला दोन वाघिणी देण्यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले. त्यामुळे स्थानांतरणाची ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील सिंह जवळजवळ संपले आहेत, तीच पुनरावृत्ती वाघांच्या बाबतीत होऊ नये म्हणून हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.
३ नोव्हेंबर २००८
चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढकीच्या जंगलातून अतिशय गंभीर अवस्थेत ‘जाई’ आणि ‘जुई’ या दोन वाघिणींना आणण्यात आले होते. यातील ‘जाई’ ला दिल्लीवरून रक्त मागवून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरीही तिचा मृत्यू झाला तर ‘जुई’ अजूनही महाराजबाग प्राणिसंग्रहालयातच आहे.
२३ जानेवारी २००९
चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोनाच्या जंगलातून वाघिणीपासून दुरावलेल्या ‘ली’, ‘जान’ आणि ‘चेरी’ या तीन मादी बछडय़ांना महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले. यातील चेरीची रवानगी दुसऱ्या राज्यातील प्राणिसंग्रहालयात झाली तर ‘ली’ आणि ‘जान’ मात्र अजूनही महाराजबाग प्राणिसंग्रहालयातच आहेत.
२६ एप्रिल २०१२
सध्या गोरेवाडय़ात असलेला ‘साहेबराव’ हा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील गोंडमोहाळीतील पाणवठय़ाजवळ शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात चार वर्षांपूर्वी अडकला होता. सुदैवाने शिकाऱ्यांचा बळी ठरला नसला तरीही त्याच्या पायाला जखम झाल्याने तीन बोटे कापावी लागली. सेमिनरी हिल्सवर त्याच्यावरही शस्त्रक्रिया झाली आणि नंतर त्याला महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच त्याची रवानगी गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली.