नागपूर : शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि भूखंड विकासक अंकुश कडू हत्याकांडाचा ‘ लाईव्ह व्हिडिओ’ अनेकांच्या ‘मोबाईलवर व्हायरल’ झाला. हजारो लोकांनी हे हत्याकांड कसे घडले? हे बघितले. मात्र, कपिलनगर पोलिसांना अद्यापर्यंत आरोपींचा सुगावा लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, आरोपी वारंवार लोकेशन बदलवीत असल्याने पोलिसांसमोर अडचणी येत आहेत. परंतु मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांना आहे.
घटनेच्या तासाभरापूर्वी अंकुश मित्राच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्याकडे तासभर गप्पा मारल्या. बराच वेळ झाल्याने ते घरी जाण्यासाठी निघाले. तिकडे पत्नी आणि मुलगा त्यांच्या प्रतीक्षेत होते, तर दुसरीकडे मारेकरीही काटा काढण्याच्या उद्देशाने सक्रिय होते. मित्राच्या घरून काही अंतरापर्यंतच गेले होते. सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. म्हाडा कॉलनी चौकात त्यांचे वाहन हळू झाले. त्याच वेळी आरोपीने त्यांना अडविले. वाहनासह त्यांना खाली पाडले. आजूबाजूला दबा धरून बसलेले इतरही आरोपी धावत गेले. धारदार शस्त्राने सपासप वार करून एका मिनिटातच त्यांचा जीव घेतला. क्षणभरातच त्यांची हलाचाल बंद झाली. रक्ताच्या थारोळ्यात ते चौकात पडून होते. विशेष म्हणजे चाकूने वार करीत असताना रस्त्याने जाणारे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. जवळपासचे दुकानदारही हे दृश्य पाहात होते. काहींची वाहने तर अगदीच जवळून गेली. मात्र, मध्यस्थीसाठी एकानेही पुढाकार घेतला नाही. रक्तबंबाळ निपचित पडून असतानाही अनेक वाहने ये-जा करीत होती. जवळपासचे लोक पाहत होते. मारेकरी पळाल्यानंतर लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कोणत्या संपत्तीतून हत्या?
अंकुश यांची शेती होती. त्यांनी शेतीवर भूखंड पाडून त्याची विक्री केली. अलीकडेच त्यांचा अकरा एकर भूखंडाप्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. मात्र, कोणत्या संपत्तीसाठी अंकुशचा जीव घेण्यात आला, यासंदर्भात कुटुंबातील सदस्यांनाही माहिती नाही. आरोपींना अटक व्हावयाची असल्याने पोलिसही या संदर्भात ठोस माहिती देऊ शकत नाहीत.