देवेंद्र गावंडे

प्रश्न मोठा गहन आहे, शिवाय पेचात टाकणारा आहे. अजित पारसेच्या बाबतीत नागपूर पोलीस दयाळू झाले असे समजायचे की पारसेसारखा नशीबवान आरोपी दुसरा नाही असा समज करून घ्यायचा? पारसे महाठग आहेच. त्याचे कारनामे अभय पुंडलिकची आठवण करून देणारे. तरीही त्याला अटक केली जात नाही. याचे कारण काय? त्याची उठबस उजव्यांच्या वर्तुळात होती म्हणून त्याला ही सवलत दिली जात असेल तर त्याला नशीबवान नाही तर आणखी काय म्हणायचे? गुन्हेगारांना हाताळण्याची ही पोलिसांची नवी पद्धत सामान्यांना चक्रावून टाकणारी आहेच शिवाय अन्य गुन्हेगारांना वाचायचे असेल तर कुठल्या वर्तुळात उठबस करायला हवी याचे स्पष्ट संकेत देणारीही आहे. मग कायदा सर्वांसाठी समान आहे या तत्त्वाचे काय? हे तत्त्व नागपूरचे पोलीस विसरले असे समजायचे काय? पारसेवर गुन्हे दाखल होऊन आता महिना होत आला. माध्यमात गाजत असलेला हा आरोपी अजून मोकाट आहे. त्याच्या तब्येतीची चिंता त्याच्याऐवजी पोलीसच वाहात आहेत. आरोपीच्या प्रकृतीची एवढी काळजी पोलिसांनी याआधीही कधी घेतली होती काय? ही यंत्रणा केव्हापासून एवढी संवेदनशील झाली? पारसेचे यकृत काम करेनासे झाले असे डॉक्टर म्हणतात. हे कशामुळे झाले तर अतिमद्यप्राशनामुळे. म्हणजे छंदीफंदी असलेल्या पारसेने स्वत:हून स्वत:च्या शरीरावर धोंडा मारून घेतला. अशाच्या बाबतीत पोलिसांनी एवढी दयामाया दाखवण्याचे कारण काय?

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…

पारसे पांढरपेशा गुन्हेगार या वर्गवारीत मोडतो. या श्रेणीतील गुन्हेगार अटक टाळण्यासाठी असे आरोग्याचे डावपेच लढवत असतात. कर्तव्यकठोर म्हणवून घेणाऱ्या पोलिसांनी त्याला बळी पडावे? अशांना अटक करून सरकारी रुग्णालयात टाकले की ते सूतासारखे सरळ येतात हा आजवरचा अनुभव. तो ठाऊक नसल्यागत पोलीस का वागत आहेत? पारसेच्या फसवणुकीची एकेक प्रकरणे ऐकली की अंगावर काटा उभा राहतो. समाजमाध्यमातून लोकांना ज्ञान पाजणारा हा माणूस प्रत्यक्षात थंड डोक्याने गुन्हे करत राहिला. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या पुरुष व महिलांची संख्याही लक्षणीय. आज बदनामीच्या भीतीने यापैकी अनेकजण समोर येत नाहीत. यातल्या अनेकांची आर्थिक लुबाडणूक पारसेने केली. तेही याच कारणाने शांत आहेत. अशा स्थितीत त्याला कोठडीत डांबले तर अनेकांना धीर येईल व ते समोर येतील. गुन्ह्याच्या तपासात हे तंत्र पोलीस अनेकदा वापरतात. नागपूरच्या पोलिसांना याचा विसर पडला असे समजायचे काय? की पीडितांनी समोर येऊच नये व प्रकरण हळूहळू शांत व्हावे असे पोलिसांना वाटते? पारसेची जवळीक कोणत्या राजकीय पक्षासोबत होती हे आता सर्वांना ठाऊक झालेले. त्याला या पक्षाच्या समाजमाध्यम विभागाचा राज्याचा प्रमुख व्हायचे होते. त्यादिशेने त्याची पावलेही पडू लागली होती. यासाठी आवश्यक असते ती नेत्यांशी जवळीक. ती साधण्यात पारसे माहीर होताच. मात्र हे पद मिळण्याआधीच पारसेने पक्षनेत्यांच्या नावाचा वापर करून अनेकांना गंडा घातला. या नेत्यांच्या वर्तुळात सक्रिय असणाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ललनांचा वापर केला. त्याच्या चित्रफिती तयार केल्या. नंतर बदनामीचा धाक दाखवून अनेकांना लुटले सुद्धा! हा सारा प्रकार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी पोलीस शांत बसलेत का?

राजकीय दबावात काम करणे ही बाब आता पोलिसांसाठी नवीन राहिलेली नाही. कर्तव्यदक्षतेचा आव आणणारा कितीही मोठा अधिकारी असो, तो दबावात येऊन काम करतो हे नागपुरातच अनेक प्रकरणात दिसून यायला लागलेले. याही प्रकरणात हा ‘अँगल’ असेल तर राजकीय वर्तुळातले लोक सुरक्षित राहतील पण पारसेकडून फसवणूक झालेल्या सामान्यांचे काय? या दबावाच्या खेळीमुळे त्यांना कधीच न्याय मिळणार नाही. याला पोलिसिंग कसे म्हणायचे? समाजमाध्यम व संगणकीय व्यवहारातून होणारी फसवणूक हा सध्या कळीचा विषय. या माध्यमातून लोकांना गंडवणारे प्रामुख्याने पांढरपेशे असतात. त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे असतात. अशा दोन प्रतिमा घेऊन वावरणाऱ्यांपासून समाजाला सर्वाधिक धोका असतो. कारण त्यांच्या प्रतिमेला भुलून अनेक लोक लीलया फसत असतात. पारसे हा त्यातला मेरुमणी! त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या बाबतीत कसलीही दयामाया न दाखवता कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य ठरते. या प्रकरणांमध्ये कठोर कारवाईतून होणारी समाजजागृती फायद्याची ठरत असते. हे साधे ज्ञान नागपूर पोलिसांना नाही असे समजायचे काय? अट्टल गुन्हेगारांना चाबकाने फोडणे, त्यांची धिंड काढणे यात तरबेज असलेले पोलीस अशा शिक्षित व सराईत गुन्हेगाराच्या बाबतीत एवढे नरमाईने का वागत आहेत? पारसेवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याला कुठला आजार आहे? त्यासाठी व्यसन कारणीभूत आहे का? या प्रश्नांपासून पोलीस अनभिज्ञ होते. त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप व त्यात होणारी शिक्षा बघता त्याला तात्काळ अटक करणे हेच पोलिसांचे कर्तव्य होते. तरीही त्याला सवलत का देण्यात आली?

पोलिसांना बघून आत्महत्येची नाटके करणारे अनेक गुन्हेगार असतात. अशांना वठणीवर कसे आणायचे याचे तंत्र या यंत्रणेला अवगत असते. मग पारसेच्या वेळी त्याचा वापर का झाला नाही? आत्महत्येची धमकी देणारे किंवा इतरांसमोर तसा प्रयत्न करणारे प्रत्यक्षात भेकड असतात. ते कधीच जीव देत नाहीत असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. तरीही पारसेने पोलीस कोठडीत काही केले तर आमच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा भीतीचा बागुलबुवा पोलिसांकडून का उभा केला जात आहे? राजकीय दबावातून पोलिसांनी ही पळवाट शोधली असे आता समजायचे काय? मुळात पारसे हे भूत वाढायला जेवढे राजकीय नेते जबाबदार आहेत तेवढेच पोलीस व माध्यमकर्मी सुद्धा! समाजमाध्यम तज्ज्ञ म्हणून मिरवायचे असेल तर प्रसिद्धी हवी हे लक्षात येताच या ठगाने माध्यमातील अनेकांना हाताशी धरले. पैसे देऊन पुरस्कार मिळवले. यातून नाव कमावून झाल्यावर स्वत:चे गुन्हेगारी प्रताप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने पोलिसांशी जवळीक साधली. कधी माध्यम विश्लेषक तर कधी सायबर तज्ज्ञ म्हणून प्रवचने झोडली. प्रत्येक अधिकाऱ्याशी वैयक्तिक ओळख निर्माण करून घेतली. याचा दुहेरी फायदा त्याने गुन्हे करताना मिळवला. ज्यांना फसवले त्यांना पोलिसांचा धाक दाखवला. अगदी गुन्हा दाखल होतपर्यंत तो या यंत्रणेतील अनेकांसाठी आदरणीय होता. माध्यमवर्तुळात सुद्धा हेच चित्र होते. असे मुखवटे घालून वावरणारे गुन्हेगार जास्त धोकादायक असतात. याची जाणीव पोलिसांना अजून होत नसेल तर या प्रकरणात नक्की कुठेतरी पाणी मुरते आहे असा संशय येतो. तो दूर व्हावा असे कायदापालनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेलाच वाटत नसेल तर निष्पक्ष न्याय या तत्त्वावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकते. पारसेच्या संदर्भात पोलिसांनी दाखवलेली ढिलाई याच प्रश्नाला आणखी बळकट करणारी आहे.