देवेंद्र गावंडे
‘आपण भले आणि आपले काम भले’ हीच वृत्ती आम्ही जोपासतो असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सतत सांगत असतात. संघ परिवारातील संस्थांकडून होणाऱ्या सेवाकार्याच्या बाबतीत हे अगदी खरे. पण याच परिवाराकडून होणाऱ्या इतर कृतींसंदर्भात हे म्हणणे गैरलागू ठरते. ते कसे याचे उत्तर संघाच्या ताज्या प्रयत्नात दडलेले. स्वातंत्र्यासाठी झालेला चिमूरचा लढा हा विदर्भासाठी जिव्हाळ्याचा विषय. या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी १६ ऑगस्टला चिमुरात मोठा कार्यक्रम होतो. यंदाही तो झाला. हा कार्यक्रम जवळ येत असताना अचानक संघाला यातला आपला सहभाग आठवला व या परिवाराकडून पत्रकबाजी सुरू झाली. तीही नेहमीप्रमाणे निनावी स्वरूपाची. म्हणजे पत्रकावर स्वाक्षरी कुणाचीच नाही. लोकसत्ताने याचा पाठपुरावा केल्यावर संघाच्या प्रचाराची धुरा असलेल्या संस्थेने अधिकृतपणे हे पत्रक पाठवले. त्यात स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी करण्यात आलेले दावे वादाला निमंत्रणे देणारे.
संघाच्या मते, चिमूरमध्ये शहीद झालेला बालक बालाजी रायपूरकर स्वयंसेवक होता. संघाला हा साक्षात्कार २००२ मध्ये किशोर वैद्य यांनी लिहिलेल्या ‘असे झुंजले चिमूर’ या पुस्तकातून झाल्याचे गृहीत धरले तर सध्याची निनावी पत्रकबाजी कशासाठी होती? यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी आहे म्हणून? इतकी वर्षे चिमूरला कार्यक्रम होत असताना संघ शांत का राहिला? योग्य, पोषक अथवा अनुकूल वातावरण निर्माण झाल्याशिवाय असे दावे करायचे नाहीत अशी शिकवण संघात दिली जाते की काय? हा दावा करण्याआधी संघाने इतिहासाची पडताळणी केली काय? केली असल्यास आधीचा इतिहास चुकीचा हे सिद्ध करण्यासाठी संघाकडे नवे पुरावे कोणते? असतील तर ते समोर आणण्याचे धारिष्ट्य संघ का दाखवत नाही? वैद्यांच्या पुस्तकाला ऐतिहासिक दाखल्यावर आधारित कसे मानता येईल? जुना इतिहास वगैरे सर्व झूठ, आता आम्ही सांगू तोच इतिहास या प्रचलित धोरणाचा भाग म्हणून हा दावा आहे काय? सध्याच्या ‘अनुकूल’ वातावरणात आपले म्हणणे लोक खरे मानतील असे संघाला वाटते का? चिमूरच्या संदर्भात इंग्रजांनी नोंदवलेले दस्तावेज खोटे असतील तर त्यावर आक्षेप घेण्यास एवढा वेळ का लागला? या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यलढ्यात नसण्याची सल जरा जास्तच बोचते या जाणिवेतून ही पत्रकबाजी झाली की काय?
मुळात चिमूरमध्ये शहीद झालेले बालाजी हे स्वयंसेवक असल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांचे नातेवाईक सुद्धा याबाबत ठामपणे सांगू शकत नाही. गेल्या ७५ वर्षात रायपूरकर कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाली. त्यातले जे दोघे जिवंत आहेत ते अतिशय सामान्य पद्धतीने जीवन जगत आहेत. स्वातंत्र्य सैनिक असल्याचे कोणतेही फायदे त्यांना मिळाले नाहीत. दरवर्षी कार्यक्रमाच्या वेळी आयोजकांना त्यांची आठवण होते. तेव्हा ते तिथे जातात व सत्कार स्वीकारून परततात. या दीर्घकाळात काँग्रेस सत्तेवर होती. राज्यात काही काळ भाजपलाही सत्ता मिळाली पण कुणीही या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. आता दावा करणाऱ्या संघाने सुद्धा या कुटुंबाची विचारपूस केल्याचे दिसले नाही. आधीचा इतिहास खोटा ठरवायचा असेल तर बारीकसारीक नोंदीचे उत्खनन करावे लागते. त्यातून नवे पुरावे शोधावे लागतात. मगच तो खोटा ठरवता येतो. यातले काहीही झाल्याचे दिसले नाही. तरीही हा दावा कशाच्या बळावर केला जातोय? चिमूरचा लढा गांधीप्रेरित आंदोलनातून उभा राहिला. राष्ट्रपित्यांनी ‘चले जाव’चा नारा दिला व लोक पेटून उठले. विदर्भात या लढ्याला बळ मिळाले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रियाशीलतेमुळे. त्यांच्या भजनांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा अंगार फुलवला. त्यातून झालेला उद्रेक म्हणजे चिमूर व आष्टीचा लढा. यात संघ सहभागी झाल्याचा पुरावा अजूनपर्यंत तरी समोर आलेला नाही. हेडगेवार स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले ते व्यक्तिगत पातळीवर, सरसंघचालकपदाचा त्याग करून. याचा आदर्श बालाजींनी घेतला व ते बाल स्वयंसेवक असून सुद्धा व्यक्तिगत पातळीवर या लढ्यात सहभागी झाले, असे संघाला सुचवायचे आहे काय?
हे जर खरे मानले तर बालाजी चिमूरच्या संघशाखेत जात होते हा दावा मान्य करावा लागतो. प्रत्यक्षात त्यावेळी बालाजी वरोराला शिकत होते व सुटी होती म्हणून चिमूरला घरी आले होते. मग त्यांच्या शाखेतील सहभागाचे काय? ते वरोराच्या शाखेत जात होते असा दावा संघाने सुद्धा केलेला नाही हे यात महत्त्वाचे. १९४२ च्या लढ्यात पुढाकार घेणाऱ्या तुकडोजी महाराजांनी हिंदू संमेलनाला हजेरी लावली असली तरी ते गांधींचे कट्टर अनुयायी होते. प्रत्येक सभेत ते याचा अभिमानाने उल्लेख करीत. ते १९४१ ला संघाच्या कार्यक्रमात गेल्याची नोंद आहे. त्यांचे या व्यासपीठावर जाणे, भजन-कीर्तनातून लोकजागृती करणे एवढ्याचपुरते मर्यादित होते. तसाही उल्लेख इतिहासात आहे. केवळ या सहभागाच्या बळावर ते आमचेच होते हे ठसवण्यासाठी संघाने हे बालाजी प्रकरण समोर आणले का? स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग सोडला तर तुकडोजी महाराजांना राजकारणात फार रस नव्हता. कोणताही संत राष्ट्रनिर्माणासाठी झटत असतोच. त्याच्या या कृतीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघणे चूकच. संघाने बालाजींना स्वयंसेवक ठरवल्याने चिमूरच्या लढ्यातील राष्ट्रसंताचे योगदान कमी होणारे नाही पण भविष्यात तसा कुणी अर्थ काढला तर होणाऱ्या वादाची जबाबदारी संघ घेणार काय? स्वातंत्र्याची चळवळ कमजोर करण्यासाठी हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे मनसुबे इंग्रजांनी आखले होते. १९४२ ला तर याला अधिक जोर चढलेला. चिमूरमध्ये इंग्रजांना हुसकावून लावल्यावर लोकांनी संपूर्ण एक दिवस स्वातंत्र्य अनुभवले. हा धागा पकडून आम्ही चिमुरात समांतर सरकार चालवले असा दावा हे पत्रक करते. मुळात हे आंदोलन राष्ट्रसंताच्या नेतृत्वात राष्ट्रीय दलाकडून केल्याचा उल्लेख गॅझेटमध्ये आहे. हे दल म्हणजे काँग्रेस असा निष्कर्ष अभ्यासक काढतात. बालाजींचे सोडा पण चिमूरमधील संघाचे तेव्हाचे लोक स्वयंसेवक या नात्याने यात सहभागी झाल्याची नोंद इतिहासात नाही. संघ काँग्रेसच्या नेतृत्वात या लढ्यात सहभागी झाला असे हे पत्रक म्हणते. मग दुसरीकडे याच पत्रकातील ‘संघाच्या स्वयंसेवकांनी समांतर सरकार स्थापले’ हा दावा कसा योग्य ठरू शकतो? कुणीही आक्षेप घेऊ नये म्हणून एकीकडे काँग्रेसचे नाव घ्यायचे व दुसरीकडे समांतर सरकारचे श्रेय स्वत: घ्यायचे हा दुटप्पीपणा कशासाठी? स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग एकदा लोकांच्या गळी उतरवला की सध्या सुरू असलेल्या राष्ट्रभक्तीच्या मोहिमेला अधिक बळ येईल असे संघाला वाटते की काय? या प्रश्नांना भिडण्यापेक्षा संघाने इतिहासात न रमता वास्तवात काय यावर लोकांचे प्रबोधन करणे उत्तम. तसेही जनमानसावर त्यांचे गारुड आहेच की!
devendra.gawande@expressindia.com