देवेंद्र गावंडे

श्रद्धेच्या मुद्यावर कचखाऊ भूमिका घेणाऱ्या नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर चर्चा करण्याआधी भारतीय घटनेने राज्य सरकारांसाठी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे काय म्हणतात ते एकदा बघू. या तत्त्वातील कलम ५३ मध्ये सरकारांनी नागरिकांमध्ये वैज्ञानिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. नागरिकांमध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन निर्माण होईल याची काळजी घ्यावी. उपराजधानीतील पोलिसांनी अथवा त्यांच्या प्रमुखांनी हे कलम वाचले नसेल का? विशेष म्हणजे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अंमलात आणताना याच कलमाचा आधार घेतला गेला. हे पोलिसांना ठाऊकच नाही असे आता समजायचे काय? तो कोण कुठला छत्तरपूरचा महाराज इथे येतो काय? अकलेचे तारे तोडत अंधश्रद्धा पसरवतो काय? ‘अर्जी लगाओ’ सारखे भविष्यकथनाचे कार्यक्रम उघडपणे, तेही जगाला दिशा देण्याचा दावा करणाऱ्या रेशीमबागच्या मैदानावर करतो काय? तरीही त्यात नागपूर पोलिसांना काहीच गैर वाटत नाही? या महाराजाने अंधश्रद्धा पसरवली नाही असे पोलीस आयुक्त छातीठोकपणे सांगून मोकळे होतात. याला व्यवस्था सरकारांना शरण गेली असे म्हणायचे की व्यवस्थेने माती खाल्ली असे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

हा कथित बाबा फसवतो कुणाला तर त्याच्या दरबारात जमलेल्या बहुसंख्य हिंदूंनाच. सध्या केंद्र असो की राज्य सरकार, यातला प्रत्येकजण आम्ही हिंदूच्या रक्षणाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत असे जाहीरपणे सांगणारा. तरीही त्यांचीच फसवणूक होत असताना पोलीस बोटचेपी भूमिका का घेतात? राज्यकर्त्यांच्या दबावामुळे तर हे घडत नसेल ना! कसलीही पार्श्वभूमी ठाऊक नाही असे सांगत तुमचे नाव, गाव सांगणे, तुमच्या समस्या सांगणे, त्यावर उपाय सांगत तुम्हाला खुश करणे हा प्रकारच पूर्णपणे अंधश्रद्धा पसरवणारा. या बाबाने तो येथे केला त्याचे चित्रीकरण उपलब्ध असताना सुद्धा पोलीस प्रमुख हा गुन्हा ठरत नाही असे बेधडक विधान करतात. मग याच न्यायाने दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही या बाबाकडे हजेरी लावलेली या प्रमुखांना चालणार आहे का? उद्या हा बाबा पोलीस मुख्यालयातच दरबार थाटून बसला तर हे प्रमुख त्याचे स्वागत करायला जातील का? याच मुख्यालयात रोज शेकडो नागरिक त्यांची गाऱ्हाणी घेऊन आयुक्तांना भेटत असतात. हा बाबा जर कायदा पाळून लोकांच्या अडचणी सोडवणारा असेल तर त्यालाच पोलीस मुख्यालयात आणून बसवा ना! तेवढेच प्रमुखांचे काम हलके होईल. या महाराजाला केवळ सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने येथे आणले, त्याच्या भेटीसाठी राज्यकर्ते रांग लावून उभे राहिले म्हणून त्याच्यावर कारवाई करायची नाही याला न्यायपूर्ण वागणे कसे म्हणायचे? राज्य सरकारने संमत केलेल्या कायद्यात अशाप्रकारची अंधश्रद्धा पसरवणारी कृत्ये करणे किंवा त्याचा प्रसार करणे हा गुन्हा ठरतो. या छत्तरपूरवाल्या बाबाने येथे ही कृत्ये केली नाही असे गृहीत धरले तरी त्याच्या आधीच्या ‘अर्जी लगाओ’ सारख्या कार्यक्रमांचे प्रसारण केले. त्याच्या चित्रफिती भक्तांमध्ये पसरवल्या. हा गुन्हा ठरत असूनही आयुक्त तो ठरत नाही असे म्हणत असतील तर पोलीस दलाचे ब्रीद काय कामाचे?

नागपूर पोलिसांची ही भूमिका अतिशय मागासपणाकडे नेणारी आहेच शिवाय कितीही कायदे केले तरी राज्यकर्ते जोवर हिरवा झेंडा दाखवत नाही तोवर त्याचा वापर करणार नाही हेच दर्शवणारी आहे. मग यंत्रणेच्या स्वातंत्र्याचे काय? ते गहाण टाकण्याचे काम कोण करत आहे? अशा पांढरपेशा गुन्हेगारांच्या बाबतीत पोलिसांचे असेच नरमाईचे धोरण असेल तर मग अट्टल गुन्हेगारांनाच कठोर शासन का? त्यांनाही जे करायचे ते करू द्या. होऊ द्या या शहराची बजबजपुरी. तसेही हे शहर गुन्हेगारांचे नंदनवन म्हणून ओळखले जातेच की! सराईत गुन्हेगार कुठला तरी हेतू ठेवून एखाद्याचा खून करतो किंवा अन्य गुन्हेगारी कृत्य करतो. यात पीडितांची संख्या मर्यादित असते. असले बाबा अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेकांच्या मेंदूचा खूनच करत असतात. यात पीडितांची संख्या शेकडो पटीत असते. मग या बाबाला अट्टल गुन्हेगार नाही तर आणखी काय म्हणायचे? याचे उत्तर स्वत:ला कायदाप्रेमी म्हणवणाऱ्या पोलीस आयुक्तांकडे आहे का? असेल तर ती देण्याची त्यांची तयारी आहे का? कायदेपालनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा ही व्यवस्थेमधील एक महत्त्वाचा घटक. तोच राज्यकर्त्यांसमोर मिंधा होत असेल तर सामान्य लोकांनी न्यायाची अपेक्षा ठेवायची तरी कुणाकडून? ज्या श्याम मानवांनी या कारवाईचा आग्रह धरला त्यांच्या व दाभोळकरांच्या प्रयत्नातून हा कायदा तयार झाला. दाभोळकरांची हत्या अशाच अंधश्रद्ध व धर्मप्रेमी लोकांनी केली. आता केवळ मानव उरले. त्यांनीच हा कायदा राज्यातील पोलीस दलाला समजावून सांगितला. आज त्याच मानवांना खोटे ठरवण्याची हिंमत पोलीस प्रमुख दाखवत आहेत. गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे सांगून मानवांना काही समजत नाही हेच त्यांचे अप्रत्यक्ष सांगणे आहे.

कायद्याच्या निर्मात्यालाच ‘तुला काही समजत नाही’ असे सांगायला हिंमत लागते. ती आयुक्तांमध्ये आली कुठून? कुणाच्या बळावर ते एवढे धाडस करत आहेत? याची उत्तरे साऱ्यांना कळतात. त्यासाठी अंधश्रद्ध होण्याची सुद्धा गरज नाही. मात्र पोलिसांची ही भूमिका निश्चितच अराजकाला निमंत्रण देणारी आहे. धर्माचा बुरखा पांघरून पक्षाचा राजकीय एजेंडा राबवणारे अनेकजण पोलिसांच्या या कृतीमुळे आनंदित झाले आहेत. नव्हे, त्यांच्या आवेशात भर पडली आहे. त्यातल्याच काहींनी मानवांच्या सभेत गोंधळ घालण्याचे धाडस केले. पोलीस जर असेच बाबा, महाराजांना पाठीशी घालत राहतील तर या धर्माच्या ठेकेदारांची हिंमत आणखी वाढून ते उन्माद करतील. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे हे आता पोलिसांना ठरवायचे आहे. समाजाने अशा भाकडकथा सांगणाऱ्या कोणत्याही बुवाबाजीला बळी पडू नये. समाज जास्तीत जास्त विज्ञाननिष्ठ व्हावा हेच कुठल्याही राज्यव्यवस्थेचे धोरण असायला हवे. घटनाकारांना तेच अपेक्षित होते व त्यानुसारच घटना तयार झाली. त्यालाच तिलांजली देण्याचे पातक आपल्याकडून घडते आहे याची जाणीव पोलीस आयुक्तांना नसेल काय? धर्म हा व्यक्तिगत श्रद्धेचा भाग जरूर आहे पण त्याच्या आडून असले जाहीर उद्योग कुणी करत असेल तर त्याला चाप लावण्याचे काम पोलिसांचे आहे. ते सोडून या बोगस महाराजाला श्रद्धेय ठरवण्याचे कृत्य पोलिसांकडून घडले आहे. सरकारशरण व्यवस्थेचे यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण असूच शकत नाही.