देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांसमोर खोटा इतिहास कथन करणे हे पापच. इतिहासकालीन संदर्भ देताना त्यावर स्वत:ची मते मांडणे गैर नाही पण संदर्भच चुकीचे देणे हे महापाप. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडून हेच पातक घडले. शहराच्या प्रथम नागरिकाने असे वागावे आणि वस्तुनिष्ठ माहिती व ज्ञानाच्या प्रसाराची जबाबदारी असलेल्या नागपूर विद्यापीठाने यावर चुप्पी साधावी हे आणखीच दुर्दैवी. प्रसंग होता विद्यार्थी संसदेच्या तालीम सत्रातला. तेथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तिवारींनी जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख एकेरी केला. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना असे संबोधण्याची हिंमत दाखवल्याबद्दल समस्त उजव्यांनी खरे तर तिवारींचे अभिनंदन करायला हवे. एवढय़ावरच थांबतील ते तिवारी कसले? त्यांनी भारत-चीनमधील युद्धातील पराजयाला नेहरूंना जबाबदार धरले. त्यांच्या उदार धोरणामुळे हे घडले व तेव्हापासून चीनचा सीमातंटा सुरू झाला असे म्हणत त्यांनी आजच्या द्विराष्ट्रीय तणावाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे नेहरूंवर ढकलली. इतिहास चाळून बघितला तर तिवारी चुकीचे बोलले हे पानापानावरून सिद्ध होते.

मुळात चीनपासून आपल्याला धोका आहे हे नेहरूंनी १९५० मध्येच सांगितले होते. तेव्हा चीनमध्येही गरिबी होती. तेथील जनता शिक्षित नव्हती. तरीही तेथील राजवटीने सारे लक्ष सैन्य उभारणीवर केंद्रित केले. त्यामुळे त्यांचे लष्कर आपल्यापेक्षा पाच पटीने मोठे झाले. उलट नेहरूंनी सैन्यसामथ्र्य वाढवण्याऐवजी देशविकासावर भर दिला. देशात घटना व लोकशाही रुजवणे, धरणे बांधणे, अणुशक्ती कार्यक्रमाला चालना देणे, कारखानदारी सुरू करणे याकडे त्यांनी लक्ष दिले. स्वातंत्र्यापूर्वी व नंतर सुद्धा देशात दर तीन वर्षांनी दुष्काळ पडायचा. त्यात लाखो लोक मरायचे. नेहरूंच्या धोरणांमुळे दुष्काळ थांबले. त्यांनी तेव्हा लोकशाहीऐवजी अप्रत्यक्ष हुकूमशाहीला प्राधान्य दिले असते तर आज तिवारींना बोलताही आले नसते. एकूणच नेहरूंनी विकासाकडे तर चीनने लष्कराकडे लक्ष दिल्याने त्या युद्धात आपला पराभव झाला. चीनचे आरंभापासूनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेता आजच्या सीमातंटय़ाला तेव्हाचा पराभव जबाबदार आहे असे म्हणणे अज्ञानमूलकतेचेच लक्षण. तेच तिवारींच्या वक्तव्यातून दिसले. त्यांनी दुसरा संदर्भ दिला तो बांगलादेशच्या युद्धाचा. हे निर्विवाद इंदिरा गांधींचे यश होते. त्यावेळी अटलजींनी त्यांना बांगलादेशचे विलीनीकरण आपल्यात करून घ्या, असा सल्ला दिल्याचे तिवारी म्हणतात. हे साफ खोटे. तसा कोणताही उल्लेख इतिहासात नाही. उलट अटलजींनी इंदिरांचे वर्णन ‘दुर्गा’ असे केलेले. तिवारी येथेच थांबले नाही तर हे विलीनीकरण तेव्हा झाले असते तर आज तिथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना घडल्याच नसत्या असे धडधडीत असत्य विधान ते करते झाले. मुळात आजच्या तेथील अत्याचाराचा संबंध भारताने नागरिकत्वाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेशी आहे. सर्व जगभर ही बाब पुरती स्पष्ट झाली असताना आजच्या तिथल्या हिंसाचाराला अप्रत्यक्षपणे इंदिरांना जबाबदार ठरवण्याचा तिवारींचा प्रयत्न केविलवाणा म्हणावा असाच. तिवारी यांनी हीच वक्तव्ये एखाद्या राजकीय व्यासपीठावरून केली असती तर ते एकदाचे समजून घेता आले असते. आजकाल कोणत्याही अराजक वा अपयशाला गांधी, नेहरूंनाच जबाबदार धरण्याची लाटच आलेली. त्यात उजवे हिरिरीने सहभागी होतात. तिवारी मूळचे तेच असल्याने राजकीय पातळीवर त्यांचे भाषण खपून गेले असते पण ते विद्यार्थ्यांसमोर बोलले व विद्यापीठातले सारे कणाहीन धुरिण तेथे उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांना डावा, उजवा, मध्यम विचार, त्यावर आधारलेले पक्षीय राजकारण याची माहिती देण्यात काही गैर नाही. ज्ञानसाधनेसाठी ते आवश्यकच, पण चुकीचे, संदर्भहीन व असत्य कथन किमान त्यांच्यासमोर तरी करायला नको. तिवारी नेमके तिथेच चुकले. अशा विधानांमुळे नवी पिढी उजव्या विचारांच्या अधिक जवळ येईल. गांधी, नेहरूंचा द्वेष करू लागेल हाच त्यांचा हेतू असावा. सध्या सारेच सत्ताधारी या हेतूने भारावलेले, अशावेळी विद्यापीठांची भूमिका निर्णायक असावी लागते. नागपूर विद्यापीठ नेमके तेथेच वारंवार अनुत्तीर्ण होत आहे. विद्यापीठात महत्त्वाच्या पदावर बसलेले सारेच कळसूत्री बाहुल्या आहेत की काय, अशी शंका वारंवार यायला लागली आहे. या बाहुल्यांना नियंत्रित करणारे कोण हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्यार्थ्यांना राजकारण, पक्षीय पद्धत शिकवायलाच हवी पण त्यात भेसळ करून नाही. जे असेल ते वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडा व त्यांना विचार करू द्या. त्यानंतर त्यांनी उजवे उपरणे अंगावर घेतले तर कुणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही पण, चुकीचे व तथ्यहीन बोलून विद्यार्थ्यांना आपल्या बाजूने करून घेता येईल असा तर्क लावत कृती करणे अक्षम्यच. आता जी नांदते आहे तीच खरी लोकशाही असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे बुद्धीभ्रम पसरवणारी वक्तव्ये करायची हा ढोंगीपणा झाला.

किमान या कार्यक्रमानंतर तरी विद्यापीठाने ऐतिहासिक सत्य काय ते विद्यार्थ्यांना तातडीने सांगणे गरजेचे होते. तसे घडले नाही. एकतर येथे काम करणाऱ्या विद्वानांना हे सत्य ठाऊक नसावे किंवा असले तरी सूत्रधारांच्या समोर बोलण्याची त्यांची हिंमत झाली नसावी. शिक्षण क्षेत्राला राजकारणाचा अड्डा बनवण्याची ही प्रथा तशी जुनीच पण अलीकडे त्याचा अतिरेक होऊ लागलेला. या विद्यापीठात तर शिक्षण वगैरे काही नाही. उजवे असणे हीच पात्रता निश्चित झालेली. मग तो नियुक्तयांचा मुद्दा असो वा कार्यक्रम घेण्याचा. नंतर प्रत्यक्ष संसद सुरू झाल्यावर काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी तिवारींच्या भाषणाचा प्रतिवाद केला पण त्यांचाही अभ्यास नसल्याचे दिसून आले. गांधी, नेहरूंवर टीका झाली, याचा अर्थ त्यांचे योगदान मोठे होते असे वरवरचे विधान त्यांनी केले. खरे तर खरा इतिहास सांगण्याची त्यांना योग्य संधी होती, ती त्यांनी वाया घालवली. सध्या काँग्रेसचे हे असे संधी वाया दवडणेच सातत्याने सुरू आहे. मूळ मुद्दा विद्यापीठाचा आहे. उजवीकरणाच्या  नादात येथील प्रशासन इतके वाहवत गेले आहे की त्याने कशाचीही तमा बाळगणेच सोडून दिले आहे. आम्ही म्हणू तेच, आम्हाला हवे तसेच होईल अशी भूमिका सातत्याने हे विद्यापीठ घेत आलेले. येणाऱ्या वक्तयांना भाषणाच्या प्रती आधी द्या, असे सांगणारे प्रशासन सध्या अस्तित्वात आहे. ही एकप्रकारची अरेरावीच, जी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी घातक. सत्ता आज असते, उद्या नाही याचा विसर येथील सूत्रधारांना पडला आहे. त्यात सर्वाधिक नुकसान होते ते विद्यार्थ्यांचे. मात्र त्याच्याशी कुणाला काही घेणेदेणे नाही इतका विचार विस्ताराचा पगडा साऱ्यांवर पडलेला. कुणाला तरी शिव्या देऊन, टीका व निंदानालस्ती करूनच विचार समोर नेता येतो या भ्रमात हे सारे अडकले आहेत.