‘पंचम वेद’ ला द्वितीय तर ‘अथांग’ला तिसरा पुरस्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्कृष्ट एकांकिकेसह तब्बल सात पुरस्कारांवर मोहोर उमटवलेल्या वीरेंद्र गणवीर लिखित ‘गटार’ एकांकिकेने आज इतिहास रचला. द्वितीय क्रमांकावर ‘पंचम वेद’ तर तिसऱ्या क्रमांकावर ‘अथांग’ने बाजी मारली. पुरस्कार वितरणास सुरुवात होताच एकेक पुरस्कार मिळत असल्याने सायंटिफिक सभागृहात ‘गटार’च्या चमूने एकच जल्लोष केला.

उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक ‘अथांग’च्या प्रणाली राऊत हिने पटकावले. मात्र, प्रकाश योजना, लेखक, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनेता असे सात पारितोषिक पटकावून धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या ‘गटार’ने एका सामाजिक विषयावर उपस्थितांना आणि परीक्षकांनाही विचार करण्यास भाग पाडले. ‘पंचम वेद’ या नाटकाने एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर हृदय प्रत्यारोपण या विषयावर ‘अथांग’ने लक्ष वेधले.

राज्यस्तरीय लोकांकिका स्पर्धेतील विभागीय अंतिम फेरीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सभागृहात विद्यार्थ्यांनी ‘गटार’ नाव जोरजोराने पुकारण्यास सुरुवात केली. एकामागून एक पुरस्कार गटारने पटकावले. १० हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर यांच्या हस्ते तसेच परीक्षक मंगेश कदम आणि अरविंद औंध यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला.  ‘लोकसत्ता’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा विद्यार्थ्यांनी पाहिजे तसा उपयोग केलेला नाही’, या शब्दात परीक्षक मंगेश कदम यांनी खेद व्यक्त केला.  गुणवत्तेच्या दृष्टीने विचार केल्यास नागपूर केंद्रावरील एकांकिका माघारलेल्या वटतात. त्यामुळे फार निराशा झाली. विद्यार्थ्यांमध्ये चुरस, ईर्षां, स्पिरीट दिसून आले नाही. एवढेच नव्हे तर स्पर्धकांच्या एकांकिका पहायलाही सभागृहात कोणी नव्हते. विषयामध्ये वैविध्य नाही. आज जागतिकीकरणाचे कितीतरी भयाण परिणाम  युवावर्गावर, कुटुंबावर झाले आहेत. मात्र, त्याचे प्रतिबिंब स्पर्धेत दिसून आले नाही. आम्ही दोन मिनिटात निकाल तयार केला. विद्यार्थ्यांनी यातून काही बोध घ्यावा, असे ते म्हणाले. दुसरे परीक्षक अरविंद औंध यांनी तरुणाईची ऊर्जा पुन्हा नाटकाकडे वळल्याने लोकांकिका उपक्रमाचे कौतुक केले. सोबतच लेखन आणि दिग्दर्शनातील सफाई साधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.  प्रास्ताविक लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे यांनी केले. व्यासपीठावर जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक सारंग पाटील, प्राथमिक फेरीतील परीक्षक डॉ. भाग्यश्री चिटणीस उपस्थित होते. वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे यांनी पुरस्कारांची घोषणा केली व उपस्थितांचे आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2018
First published on: 11-12-2018 at 01:18 IST