लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ; मनोहर म्हैसाळकर यांचे प्रतिपादन
लोकसत्ताच्या दर्जेदार अंकाची परंपरा या दिवाळी अंकानेही कायम राखली आहे. विशेष म्हणजे, विदर्भाचा सांस्कृतिक वारसा या दिवाळी अंकाच्या निमित्ताने समोर आला आहे. विदर्भ दिवाळी अंकाचे प्रकाशन चार दशकाहून अधिक काळापासून लोकसत्ताच्या माझ्यासारख्या वाचकाच्या हातून होणे म्हणजे एका वाचकाचाच सन्मान आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले.
मनोहर म्हैसाळकर यांनी यावेळी त्यांचे आणि लोकसत्ताच्या गेल्या चार-पाच दशकांपासूनच्या संबंधांना उजाळा दिला. विद्याधर गोखले, माधव गडकरी, अरुण टिकेकर यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उलगडा त्यांनी यावेळी केला. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीची निर्मितीकथाही त्यांनी सांगितली. लोकसत्ताची निकटची परंपरा या प्रकाशन सोहळ्यानिमित्त जपली गेली, असे म्हैसाळकर म्हणाले. याप्रसंगी लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे यांनी ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकामागील भूमिका मांडली. दरवर्षी वेगवेगळे विषय दिवाळी अंकातून मांडण्याची परंपरा यंदाही जपल्याचे ते म्हणाले.
वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक बी.के. ख्वाजा यांनीही यावेळी ‘विदर्भरंग’ दिवाळी अंक हा विदर्भात सर्वाधिक वाचकांपर्यंत पोहोचणारा एकमेव दिवाळी अंक असल्याचे सांगितले. याप्रसंगी दिवाळी अंकाची मांडणी करणारे जयंत गोडबोले, भूषण ठकरेले, जयंत मदने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार राम भाकरे यांनी केले. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक चंद्रकांत ढाकुलकर, लोकसत्ताच्या संपादकीय, वितरण, जाहिरात, आय.टी. विभागाचे सर्व सहकारी उपस्थित होते.

वारसा कलेचा..
लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग’ या दिवाळी अंकाने यावर्षीही त्यांची वेगळ्या विषयाची परंपरा कायम राखली आहे. विदर्भाला कलेची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यातील तो कलेचा वारसा जपलेल्या काही निवडक कुटुंबांचा परिचय या अंकातून करून देण्याचा प्रयोग केला आहे. नाटय़कलेच्या क्षेत्रातील नागपूरचे दारव्हेकर घराणे, नृत्यकलेतील अमरावतीचे बोडे कुटुंब, नकलांच्या क्षेत्रातील चिटणीस घराणे, बहुरूपींचा वारसा जोपासणारे यवतमाळ जिल्ह्य़ातील माहुरे कुटुंब, शाहिरीतील बुलडाण्याचे राजपूत घराणे, लोप पावत चाललेल्या ‘डहाका’ या लोककलेतील कामठीचे बावनकुळे घराणे, कीर्तनाची समृद्ध परंपरा जपणारे नागपूरचे देवरस घराणे, मूर्तीकलेच्या क्षेत्रातील चंद्रपूरचे पाटणकर कुटुंब, संगीत वाद्यनिर्मितीच्या क्षेत्रातील मरोडे घराणे, गायनाच्या क्षेत्रातील वध्रेचे जळीत कुटुंब, मेळघाटसारख्या जंगलात राहून बांबूकलेचा वारसा समोर नेणारे चौहान घराणे, पखवाजवादनाच्या क्षेत्रातील पिंपळघरे कुटुंब, मूर्तीकलेच्या क्षेत्रातील नागपूरचे सूर्यवंशी घराणे, अशा काही घराण्यांची ओळख यात करून देण्यात आली आहे.