प्रेयसीचा मात्र प्रियकराला नकार

नागपूर : प्रेयसीला तिच्या आईवडिलांनी घरात बंदी बनवून ठेवले आहे, असा दावा करणारी याचिका एका प्रियकराने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. या याचिकेनंतर पोलिसांनी प्रेयसीला न्यायालयात हजर केले. परंतु तिने आईवडिलांसोबतच राहायचे असल्याचे सांगितले. या ‘अजब प्रेम की गजब कहानी’चा अद्याप शेवट झाला नसून न्यायालयाने सध्या तिला आईवडिलांसोबत जाण्यास सांगितले. या प्रकरणावर ५ जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

अभिषेक असे याचिकाकर्त्यां प्रियकराचे नाव आहे. त्याची प्रेयसी पुण्यात  नोकरी करते.  टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी दोघेही पुण्यात एकत्र राहात होते. टाळेबंदीमुळे त्यांनी नागपुरात परतण्याचा निर्णय घेतला. नागपुरात आल्यानंतर ती आपल्या घरी न राहता अभिषेकसोबत हॉटेलमध्ये  राहायची. काही दिवसांपूर्वी ती आपल्या आईवडिलांना भेटायला गेली व परत आलीच नाही. अभिषेकसोबत संपर्कही थांबला. त्यामुळे अभिषेक याने उच्च न्यायालयात धाव घेतली व प्रेयसीच्या आईवडिलांनी तिला घरात डांबून ठेवले आहे. तिला हजर करण्यात यावे, अशी विनंती केली. न्यायालयाच्या आदेशानंतर सीताबर्डी पोलिसांनी तिचा शोध घेऊन शुक्रवारी सकाळी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तरुणीशी एकांतात संवाद साधला. त्यानंतर तिच्या आईचे मत जाणून घेण्यात आले. आईने प्रेमाला विरोध नसल्याचे सांगितले.  संगणक, लॅपटॉपचा अतिरिक्त वापर करणे व मोबाईलवर सतत बोलण्यापासून मुलीला रोखले. पण, हे सर्व केवळ एका मुलीचे पालक म्हणून केले. त्यानंतरही तिला अभिषेकसोबत जायचे असेल, तर आपली हरकत नाही, असे आईने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने तरुणीला तिची इच्छा विचारली असता तिने वेळ घेऊन शेवटी आईवडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय कुणाच्या दबावात घेतला का, हे जाणून घेण्यासाठी सरकारी वकील व न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांनी तिच्याशी संवाद साधला.  न्यायालयाने प्रकरणावर ५ डिसेंबरला नियमित खंडपीठात सुनावणी घेण्याचे आदेश दिले. ही सर्व प्रक्रिया अवकाशकालीन न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष पार पडली.