अकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी प्रत्येकी एका जनावरांना ‘लम्पी’ त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले आहे. या सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. सकारात्मक अहवाल आल्यावर त्याचे आदेश प्र. जिल्हा दंडाधिकारी वैष्णवी बी. यांनी काढला.

पातूर तालुक्यातील आलेगावातील एका गायीमध्ये, आसोला गावातील एका बैलामध्ये, बार्शिटाकळी तालुक्यातील येवता या गावातील नर वासरामध्ये व मूर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा गावातील एका बैलामध्ये ‘लम्पी’ त्वचारोगाची लागण आढळून आली. या चारही गावांतील संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा – नागपुरात जी-२० फलकाचा बॅरिकेड्स म्हणून वापर

हेही वाचा – कर्मचारी नव्हे साक्षात ‘देवदूत’च! सतर्कतेमुळे टळले मोठे रेल्वे अपघात; ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाच किमी परिघातील जनावरांना लसीकरण करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांनी नियोजन करून लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.