नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबवण्यात आली.
या प्रशिक्षणातून ३२ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. महाज्योतीमार्फत २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५०७ उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी ४८२ उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला.




हेही वाचा >>> जून हिवताप प्रतिरोध महिना म्हणून का घोषित केला, जाणून घ्या…
उमेदवारांना दरम्यानच्या काळात प्रतिमाह सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले. नुकतेच या प्रशिक्षणातून ३२ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जयश्री चव्हाण, पल्लवी चिलगर, राहुल राठोड, रोहिदास खेडेकर, विकास मुंडे, असाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील, योगेश दारूंटे, जगदीश चव्हाण, सूरज जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. भविष्यातही नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहेत. अशा प्रशिक्षणातून नोकरीमध्ये महाज्योतीच्या प्रशिक्षणार्थींचा टक्का वाढवण्यावर भर आहे. – राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती.
‘महाज्योती’मुळे भविष्य सुरक्षित झाले
घरी कोरडवाहू शेती असल्याने आई-बाबा बाहेर कामाला जायचे. बारावी शिक्षण झाल्यावर मला मित्राने महाज्योतीच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. महाज्योतीच्या प्रशिक्षणामुळे शारीरिक शिक्षण, लेखी परीक्षेचे क्लासेस सुरू करता आले. तसेच विद्यावेतन मिळाल्याने आर्थिक मदत झाली. संस्थेमुळे मला भविष्य सुरक्षित करता आले. – राहुल राठोड, सेनगाव.