गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावर तापलं होतं. सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवड्यात ठराव करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्य विधिमंडळात ठराव करून, त्यात सीमाभागातील इंच आणि इंच जमीन महाराष्ट्राचीच असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. या ठरावाबाबत शिवसेना विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत टोलेबाजी केली आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाबाबत ठराव मांडला. त्या ठरावाला पूर्ण सभागृहाने एकमताने पाठींबा दिला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. सीमावासीयांसाठी जाहीर केलेल्या योजनांमुळे त्यांना आधार वाटणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोणातेही राजकारण न करता मजबूतीने सीमावासीयांच्या पाठिमागे उभा राहिला आहे, हे ठरावातून दिसलं,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

“तुम्ही ४० लोक घेऊन जात सरकार…”

“सीमाप्रश्नी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राजकीय फटकेबाजी केली. हा काय राजकीय विषय नव्हता. आज त्यांच्या कर्तुत्वाला कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला नाही. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीची ३३ देशांनी दखल घेतली आहे. ते देखील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, आम्ही सुद्धा बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही ४० लोक घेऊन जात सरकार स्थापन केलं. या लोकांची निवडून आणायची जबाबदारी माझी आहे, असं आपण सांगितलं. एकजण जरी पडला तर मी राजीनामा देईल, हे आपलं वाक्य आहे,” असं अनिल परब म्हणाले.

“आपण बाळासाहेबांच्या पायावर हात ठेऊन…”

“फक्त एकच हात जोडून विनंती आहे, आपण बाळासाहेबांच्या पायावर हात ठेऊन सांगा पुढच्यावेळी भाजपाच्या तिकीटावर आम्ही लढणार नाही. किती लोक भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत, याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. तुमच्या जीवावर लढून आम्हाला पराभूत करा, आम्ही स्वागत करू,” असं आव्हान अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खुर्ची आणि सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर…”

याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “आपण चिंता करु नका. आपल्याला एवढेच सांगतो, तुम्ही निवडून आला तेव्हा भाजपा आमदारांची मदत लागली. जे खासदार आणि आमदार उरलेत तुमच्याकडे ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्ची आणि सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेला. तेव्हापासून बाळसाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार तुम्हाला राहिला नाही,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.