scorecardresearch

घरकामगारांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक ; नोंदणीअभावी अनेक महिला योजनांच्या लाभापासून वंचित

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या कामगार शाखेने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी घरकामगारांचे सर्वेक्षण हाती घेतले असून त्यात देशातील ७४२ जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागपूर : संपूर्ण देशात घरकामगार महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना ऑनलाईन नोंदणीसह इतर अटीमुळे त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही.

२०११ च्या जनगणनेनुसार, देशात घरकामगारांची संख्या ४७ लाख, ८१ हजार ३५५ आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (९ लाख ९२ हजार ४०) घरकामगार आहेत. त्यानंतर तामिळनाडू (६ लाख ५,१९९) व नंतर पश्चिम बंगाल (५ लाख ४९ हजार ३३५), आंध्रप्रदेश (४ लाख ६६ हजार २०९) या राज्यांचा क्रम लागतो. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या कामगार शाखेने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी घरकामगारांचे सर्वेक्षण हाती घेतले असून त्यात देशातील ७४२ जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक असूनही येथे कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचे या क्षेत्रातील संघटनांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात २००४ मध्ये घरगुती कामगार कल्याण मंडळ स्थापनेची घोषणा करण्यात आली होती, ती अद्याप पूर्ण झाली नाही. २०२१ मध्ये राज्य शासनाने संत जनाबाई घरकामगार योजनेची घोषणा केली. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली. २०११ नंतर नोंदणी करणाऱ्यांना पात्र ठरवण्यात आले. मात्र, बहुसंख्य महिलांनी त्यांची कामगार विभागाकडे नोंदणीच केली नाही. यामागे प्रक्रिया किचकट असणे हे कारण सांगितले जाते.

करोना काळात नोंदणी ऑनलाईन करण्यात आली. महिलांनी नोंदणीसाठी कामगार विभागाचे उंबरठे झिजवले.

परंतु तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिला नोंदणीच करू शकल्या नाहीत. नागपुरात या कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहेत.

पण नोंदणीधारक महिलांची संख्या केवळ ४५ हजार आहे. नोंदणी होऊ न शकल्याने अनेक महिला योजनांच्या लाभापासून वंचित आहेत, असे विदर्भ मोलकरीण संघटनेचे सरचिटणीस विलास भोंगाडे यांनी सांगितले.

राज्यनिहाय आकडेवारी

राज्य               संख्या

महाराष्ट्र             ९,४२,०४०

तामिळनाडू          ६,०५,१६९

पं.बंगाल            ५,४९,३३५

आंध्र प्रदेश          ४,६६,२०९

कर्नाटक                  ३,२०,५८५

गुजरात            २,३९,५१७

उत्तर प्रदेश        २,०१३१६

राज्य शासनाने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करून ही योजना सुधारित पद्धतीने लागू करावी.  – विलास भोंगाडे, सरचिटणीस, विदर्भ मोलकरीण संघटना.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra has the highest number of domestic workers zws