अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी केली जात आहे. त्यासाठी आता ऑफलाईन सोबतच ऑनलाईनचा देखील पर्याय देण्यात आला. मतदान नोंदणीला हायटेक टच प्राप्त झाला. प्रशासकीय स्तरावर रक्षक मतदारांच्या नोंदणीला वेग आला असून १ नोव्हेंबर २०२५ च्या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने नोंदणी केली जात आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येत असून, नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येकाने ६ नोव्हेंबरपर्यंत नमुना १९ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याबाबतचे परिशिष्ट ब-१ जिल्हाधिकारी कार्यालय, जि. प. कार्यालय, महापालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सर्व पंचायत समित्या व नगरपरिषदांच्या स्तरावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदारयाद्या १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकानुसार निश्चित करण्यात येत आहेत. मतदार नोंदणीसाठी पात्र शिक्षकांना ६ नोव्हेंबरपर्यंत नमुना १९ मध्ये आपला अर्ज सादर करावा लागेल. यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम ३१ (४) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात आली आहे.
शिक्षक मतदार संघासाठी नमुना क्रमांक १९ मधील अर्ज भरण्याची सूविधा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर लॉगीन करावे लागेल. पात्र शिक्षकांना आवश्यक त्या पुरावा कागदपत्रांसह ०६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक १९ मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन दाखल करण्याची सध्याची कार्यपध्दती सुध्दा मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पात्र शिक्षकांनी आपले अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधीचा सर्व तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुकांकडून नोंदणीवर जोर
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यावर भर दिला आहे. निवडणुकीसाठी इच्छुक शिक्षक मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांच्याकडून अर्ज भरून घेत आहेत. अधिकाधिक शिक्षक मतदारांची नोंदणी करून निवडणुकीसाठी आपला मार्ग मोकळा करण्याकडे इच्छुकांचा कल दिसून येतो. यानिमित्ताने शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांचा समावेश होतो.
