scorecardresearch

अमरावती : राज ठाकरे म्हणाले, ‘फक्त सेल्फी काढून उपयोग नाही, लोकांमध्ये जा…’

कार्यकर्त्यांनी केवळ सेल्फी काढून उपयोग होणार नाही. लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील.

अमरावती : राज ठाकरे म्हणाले, ‘फक्त सेल्फी काढून उपयोग नाही, लोकांमध्ये जा…’
( संग्रहित छायचित्र )

कार्यकर्त्यांनी केवळ सेल्फी काढून उपयोग होणार नाही. लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. त्याची सोडवणूक करावी लागेल, असा कानमंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. केवळ पदे घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना यापुढे मनसेत स्थान असणार नाही. जो पक्षासाठी काम करेल, तोच पदावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी गेल्या चार दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी येथील महफिल इन हॉटेलच्या सभागृहात आयोजित विभागीय मेळाव्यात बोलताना पक्षबांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले, ‘काही पदाधिकाऱ्यांना वाटत असेल, की मी राज ठाकरेंच्या जवळ आहे. त्यामुळे मी कायमस्वरूपी पदावर राहू शकतो, हे त्यांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे.

हेही वाचा >>>क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोन रशियन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात

जो पक्षासाठी काम करेल, पक्ष वाढवेल, त्याला यापुढे मनसेत महत्त्वाचे स्थान मिळेल. मनसेत संघटनात्मक पद म्हणजे शोभेची वस्तू नाही. लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देतानाच संघटना मजबूत करण्यासाठी यापुढे विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरासाठी करण्यात येईल,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज म्हणाले की, कार्यकर्त्यांनी केवळ सेल्फी काढून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे उपयोगाचे नाही. लोकांपर्यंत कार्यकर्त्यांना पोहचावे लागेल. त्यातूनच शाश्वत आणि स्थिर सत्ता मिळवण्यापर्यंतचा प्रवास आपण करू शकतो. तडजोडीतून मिळालेली सत्ता ही क्षणभंगूर असते. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या, पक्ष उभा करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी राहील.

हेही वाचा >>>चंद्रपूर : इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कामाचे सातत्य, शिस्त यातून सत्ता येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास हा त्याचे उदाहरण आहे. जनसंघाने निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांना सुरुवातीला अपयशच आले. पण, जनसंघ काम करीत राहिला. पुढे त्याचे रूपांतर भाजपमध्ये झाले. कायम विरोधी पक्षात राहूनही भाजपने काम करणे थांबवले नाही. तब्बल चार पिढ्यानंतर त्यांना आज स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सातत्याने केलेल्या आंदोलनातून परिश्रमातून हे यश मिळालेले आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.यावेळी मंचावर संदीप देशपांडे, प्रकाश महाजन, अविनाश जाधव, विठ्ठल लोखंडकार, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, राजू उंबरकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या