१.२६ लाख मे. टन उत्पादनाची निर्यात

चंद्रशेखर बोबडे

 नागपूर : रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात  दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर शेजारचे मध्यप्रदेश आहे. राज्याच्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, २०२०-२१ या वर्षांत १.२६ लाख मे.टन सेंद्रिय शेतीतील उत्पादनाची निर्यात करण्यात आली आहे.

शेतमाल उत्पादनासाठी रासायनिक खताचा वाढता वापर हा देशापुढे चिंतेचा विषय ठरल्याने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. त्यासाठी विविध योजनाही जाहीर केल्या. विविध प्रकारचे अनुदानही या योजनांद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. राज्यातही अनेक गट या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात १२५८ समूहांतील ६२ हजार ९०० शेतकऱ्यांनी २५ हजार १६० हेक्टरवर सेंद्रिय शेती केली. मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांची संख्या ही १.७५ लाखांच्या घरात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र शासनाने नुकताच २०२१-२२ या वर्षांचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला. त्यात राज्य सेंद्रिय उत्पादनात  मध्यप्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर (२२ टक्के वाटा)असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  विदर्भात सेंद्रिय शेती उत्पादन वाढावे यासाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या भागात पिकवलेला सेंद्रिय शेतमाल जर्मनी आणि कॅनडा येथे पाठवला जातो, असे सांगितले होते, हे येथे उल्लेखनीय.