अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : देशात वृद्ध नागरिकांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये देशभरात २८ हजार ५४५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यात ५ हजार ६९ गुन्हे दाखल असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

सर्वाधिक ६ हजार १८७ गुन्हे मध्य प्रदेशात दाखल आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात जेष्ठांवरील अत्याचारांचे ५ हजार ५९ गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावर तामिळनाडू (२,३७६), चौथ्या स्थानावर तेलंगण (२,१८१) आणि पाचव्या स्थानावर आंध्र प्रदेश (२,११४) आहे. स्थावर मालमत्ता, जमिनीची, संपत्तीची वाटणी आणि लुटमार करण्याच्या उद्देशातून हे गुन्हे घडले आहेत. जेष्ठांच्या हत्याकांडाच्याही घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> दूध उत्पादकांच्या खात्यात थेट जमा होणार अनुदान; आदेश लवकरच

तीन टक्के खून हे अनैतिक संबंध, प्रेमसंबंध किंवा प्रेमसंबंधात अडसर ठरल्यामुळे घडले आहेत. वृद्धांच्या विविध प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या (८५८ गुन्हे) स्थानावर आहे. यामध्ये ऑनलाईन फसवणूक, पोलीस असल्याचे सांगून लुबाडणूक आणि हनीट्रॅप करून फसवणूक केल्याच्या घटनांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात १९८ वृद्धांचे खून

देशात वृद्धांच्या हत्याकांडाचा आकडा १ हजार ३१८ एवढा असून सर्वाधिक हत्याकांडाची नोंद तामिळनाडूत झाली आहे. येथे २०१ जेष्ठांच्या हत्या झाल्या. महाराष्ट्रात १९८ वद्धांचा खून करण्यात आला. ६२ वृद्धांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. जेष्ठांच्या हत्याकांडात बहुतांश मुलगा, भाऊ, पत्नी, नातेवाईक किंवा ओळखीचाच आरोपी निघाला.