यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.५१ टक्के इतका लागला. जिल्ह्यातून या परीक्षेला ३८ हजार २६२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ८२० विद्यार्थ्यांनी १५९ केंद्रांवरून प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ३४ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीत १९ हजार ८७९ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी १७ हजार ६९३ मुले उत्तीर्ण झाली. तर १७ हजार ९४१ मुलींपैकी १६ हजार ९१९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९ इतकी असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.३० इतकी आहे. दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेतही जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली होती.
यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांची उत्तम कॉलेज निवडीसाठी धडपड सुरू झाली आहे. मात्र अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयाऐवजी केवळ नाव दाखल करण्यापुरते महाविद्यालय हवे असल्याने या विद्यार्थ्यांची व पालकांची अकरावी प्रवेशाच्या नवीन नियमाने गोची झाली आहे.
१६८ शाळांचा निकाल १०० टक्के
यंदा जिल्ह्यातील ६६५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील १६८ शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ४६१ शाळांचा निकाल ७० टक्केपेक्षा अधिक आहे. मात्र दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तेथील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही. एका शाळेचा निकाल १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ५० टक्केपेक्षा कमी निकाल असलेल्या शाळांची संख्या १४ आहे.
नेर आघाडीवर, कळंब माघारले
जिल्ह्याचा निकाल ९१.५१ टक्के लागला. जिल्ह्यात नेर तालुक्याने आघाडी घेतली असून, या तालुक्याचा निकाल ९५.३२ टक्के लागला. सर्वात कमी निकाल ७७.८३ टक्के इतका निकाल कळंब तालुक्याचा लागला. उर्वरित तालुक्यांमध्ये पुसद (९४.५० टक्के), घाटंजी (९३.३० टक्के), यवतमाळ (९३.२२ टक्के), महागाव (९३.१४ टक्के), उमरखेड (९२.९९ टक्के), दारव्हा (९२.६९ टक्के), झरी (९१.६३ टक्के), पांढरकवडा (९१.१० टक्के), दिग्रस (९०.५३ टक्के), आर्णी (९०.३८ टक्के), मारेगाव (८९.७५ टक्के), वणी (८८.७७ टक्के), बाभूळगाव (८८.१७ टक्के) आणि राळेगाव तालुक्याचा निकाला ८६.१८ टक्के लागला.