नागपूर : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य सरकार वर कर्जाचा डोंगर वाढल्याने सध्या विविध विभागातील पदभरती बंद असताना एसटी महामंडळात मात्र नवीन पदभरतीची जाहिरात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या माध्यमातून तुम्ही नोकरीची संधी मिळवू शकता. यासाठी खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
या भरती अंतर्गत एकूण ३६७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी http://www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात (एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) येथे उपलब्ध आहे. हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे.
एमपीएससीकडून २८२ पदांसाठी जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत २८२ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार असून, ९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. एमपीएससीने याबाबतची माहिती दिली. गट ब अराजपत्रित सेवेअंतर्गत राज्य कर निरीक्षक या पदाच्या २७९, तर सहायक कक्ष अधिकारी पदाच्या ३ जागा भरण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना १ ते २१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. तसेच, चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठीची मुदत २५ ऑगस्ट आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे ‘एमपीएससी’ने नमूद केले आहे.