राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा नागपुरात

मृत्यूचे कारण तातडीने समजणार असल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग 

(संग्रहित छायाचित्र)

मृत्यूचे कारण तातडीने समजणार असल्याने गुन्ह्याच्या तपासाला वेग 

नागपूर : महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांसह इतरही वन्यजीवांच्या शिकारीची प्रकरणे उघडकीस येत असताना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात प्रयोगशाळेअभावी वनखात्याला फारसे यश येत नव्हते. प्रकरणाचा तपास करताना वन्यप्राण्यांच्या डीएनए चाचणीसाठी महाराष्ट्राला हैदराबाद आणि देहरादून येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, इतर राज्यांवरील वनखात्याचे परावलंबित्व आता संपुष्टात आले असून राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा नागपुरात उभारण्यात आली आहे.

राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प आणि अनेक अभयारण्य विदर्भात आहेत. वाघांच्या सर्वाधिक संख्येमुळे शिकारीचे प्रमाणही येथे अधिक आहे. दरम्यान, या प्रयोगशाळेमुळे वन्यजीवांच्या मृत्यूचे कारण तातडीने समोर येणार असून वन्यजीव गुन्ह्याच्या तपासालाही वेग येणार आहे. अशा प्रकरणात गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी वन्यप्राण्यांची डीएनए चाचणीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हैदराबाद आणि देहरादून अशा दोनच ठिकाणी या प्रयोगशाळा असल्याने त्याठिकाणी वन्यप्राण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात होते. या प्रयोगशाळा केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने त्यासाठी मोठे शुल्क मोजावे लागत होते. त्यानंतरही तपासणीसाठी प्रतीक्षा यादीतच राहावे लागत होते आणि अहवाल येण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधीत लागत होता. यादरम्यान हे नमुने खराब होण्याची शक्यता होती. शिवाय अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यताही कमीच होती. आता या प्रयोगशाळेत शेजारच्या राज्यातील वन्यजीवांचे नमुने देखील तपासता येणार आहेत. 

अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश

२०११ पासून वन्यजीव डीएनए विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. सुरुवातीच्या काळात सिरमच्या वापराने हे विश्लेषण के ले जात होते. यात वन्यप्राण्यांच्या रक्ताची आवश्यकता होती. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याला बंदी घालण्यात आल्याने ही प्रक्रि या बंद करण्यात आली. त्यानंतर अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने विश्लेषण सुरू झाले. स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी २०१६ ला तत्त्वत: मान्यता मिळाली. २०१८ ला ही प्रयोगशाळा नागपुरात उभारण्याचे ठरले. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

विजय ठाकरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर.

डीएनए चाचणीसाठी आता इतर राज्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. राज्यातील पहिली प्रयोगशाळा नागपुरात होत असल्याने शिकारीच्या न्यायालयीन प्रकरणांचा उलगडा आता  लवकर करता येणार आहे.

सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra to set up first animals dna testing laboratory in nagpur zws

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या