अकोला : कृषिप्रधान संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणजे पोळा.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरमुळे बैलांचे कृषी क्षेत्रातील कार्य कमी झाले तरी शेतकऱ्यांकडून आजही परंपरेनुसार बैलपोळा सण उत्सहात साजरा केला जातो.महाराष्ट्रातील एकमेव बैलजोडीचा पोळा चौक अकोल्यातील जुने शहर भागात अस्तित्वात आहे. या ठिकाणी अत्यंत आकर्षक, सुंदर, डौलदार व भव्यदिव्य बैलांची जोडी साधारणत: सहा दशकांपासून उभी आहे. या चौकात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पोळ्याचा उत्सव भरत असून ही परंपरा सुमारे ८५ वर्षांनंतर आजही कायम आहे.
येथील पोळ्याचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.अकोला शहरात सण, उत्सवांची प्राचीन परंपरा निरंतर चालत आली. चातुर्मासात पालखी, कावड महोत्सव, पोळा उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक आदी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.पोळा सणाची अकोल्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे. सर्वत्र महापुरुषांचे पुतळे असतात. अकोल्यातील जुने शहर भागात मात्र सुंदर बैलजोडीचा पुतळा उभारण्यात आला. तत्कालीन नगर पालिकेने बैल जोडीचा अनोखा व आकर्षक पुतळा तयार केला. येथे अनेक वर्षांपासून सण साजरा होत असल्याने याचे नावच ‘पोळा चौक’ पडले. या चौकात आकर्षक सजावट केलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते.
शहरासह ग्रामीण भागातील सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र येतात. या ठिकाणी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट सजावटीच्या बैलांसाठी शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ही परंपरा आजही जोपासली जात आहे.संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल मालगे यांनी सांगितले की, ‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून जुने शहरात पौळा चौक आहे. सुमारे ८५ वर्षांपासून शहर व ग्रामीण भागातून शेतकरी या ठिकाणी आपल्या बैलबंडीतून साहित्य घेऊन येत होते.
तेव्हापासूनच पोळ्याची प्रथा सुरू झाली. हळूहळू पोळा हा मोठा उत्सव म्हणून येथे साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर चौकाची ओळख म्हणून बैल जोडी उभारण्यात आली. महाराष्ट्रातील या प्रकारचा हा एकमेव पोळा चौक आहे. या ठिकाणी गेल्या २५ वर्षांपासून बैलांची उत्कृष्ट सजावट स्पर्धा घेण्यात येत असून शेतकऱ्यांना सन्मानित केले जाते.’
पोळ्यानिमित्त बैलांचा थाट
पोळ्यानिमित्त बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात, पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो.