वर्धा : वैश्विक शिक्षणाचे केंद्र असलेल्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात नवा गोंधळ घडला आहे. विद्यापीठात उजवे, डावे, मध्यममार्गी व आंबेडकरवादी असे विविध वैचारिक प्रवाह कार्यरत आहेत. त्यात नेहमी पारस्परविरोधी संघर्ष ठरलेला. त्यातून भांडणे, वाद, हाणामाऱ्या, पोलीस हस्तक्षेप ठरलेला. शैक्षणिक कार्य अश्या घटनामुळे नेहमी बाधित होत असल्याने सामाजिक वर्तुळत नेहमी चिंता व्यक्त होत असते. खुद्द राष्ट्रपती महोदयांना या वादातुन कार्यक्रम रद्द करावी लागण्याची घटना ही विद्यापीठासाठी कायमचा काळा डाग देऊन गेली आहे.

आता हा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी घडला असून त्याचे पडसाद आता उमटत आहे. या दिवशी दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाचे निकाल लागले होते. त्यात भाजप समर्थतीत अ. भा. विद्यार्थी परिषदेचा पराभव झाला आणि डावी आघाडी विजयी झाली होती. डाव्यांचा विजय झाला म्हणून या हिंदी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी ‘ सॉरी सावरकर ‘ व ‘ भाग नरेंद्र ‘ अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात उपहासत्मक टीका केली म्हणून विद्यापीठ प्रशासनाने १० विद्यार्थ्यांना निलंबित केले. तसेच त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली. ही बाब डावे समर्थक गटास चांगलीच जिव्हारी लागली. मत व्यक्त करणे हा गुन्हा ठरतो कां, आम्ही आरोपी कसे, आमचे भविष्य पणास लावण्याचा अधिकार विद्यापीठास कोणी दिला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या विद्यापीठाचे कुलसचिव नवाज खान म्हणाले की ही बाब वादग्रस्त ठरू लागल्याने प्रशासन सतर्क झाले. चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात प्रत्यक्ष घटना व त्याचे व्हिडिओ फुटेज तपासल्या गेले. काही विद्यार्थी यापूर्वी पण शांती भंग करणाऱ्या घटनेत सहभागी असल्याचे दिसून आले. समितीने त्याची खतरजमा केली. मग कारवाई करण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांना रस्टिकेट केलेले नाही. त्यांचे दोन आठवड्यासाठी विद्यापीठ वसतिगृहातुन निलंबन करण्यात आले आहे. तसेच या १० विद्यार्थ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण वाढू नये व शैक्षणिक कार्य शांतीपूर्वक सूरू राहले पाहिजे असा विद्यापीठ प्रशासनाचा हेतू आहे.