अमरावती : नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात, महावितरणच्या कर्तृत्ववान ‘सौदामिनीं’चा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकुशलतेने केवळ महावितरणचाच नव्हे, तर जिल्ह्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवला आहे.
‘सन्मान सौदामिनीं’चा या कार्यक्रमात बोलताना मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी याबद्दलचा सार्थ अभिमान व्यक्त केला. सौदामिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कार्य-कर्तृत्व सिद्ध केले आहे, तर काहींनी विशेष कामगिरी करून महावितरणचाही लौकिक वाढवला आहे, ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले.
विद्युत भवन येथे आयोजित सोहळ्यात अधीक्षक अभियंता दीपक देवहाते आणि दीपाली माडेलवार यांच्यासह सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता प्रदीप पुनसे, राजेश माहुलकर, प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर, आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.वैशाली अग्निहोत्री (कनिष्ठ लिपिक): महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचावर कार्यरत असणाऱ्या वैशाली अग्निहोत्री यांनी एरोबिक्स या क्रीडा प्रकारात २००२ पासून केलेली मेहनत फळाला आली. २०११ मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर २०२३ मध्ये नेपाळ येथे झालेल्या ‘एशियन एरोबिक्स चॅम्पियनशिप’साठी त्यांची भारताकडून पंच म्हणून निवड झाली. महाराष्ट्र एरोबिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या अग्निहोत्री यांनी महावितरणसोबत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रणिता निस्ताने (सहाय्यक लेखापाल): वित्त व लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या प्रणिता निस्ताने यांनी खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना दोन वर्षांच्या अथक सरावाने कमाल केली. जून २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली ९० किलोमीटरची ‘कॉमरेड मॅराथॉन’ त्यांनी ११ तास ४४ मिनिटांत पूर्ण करून दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवले. आद्यश्री कांबे (सहाय्यक विधी अधिकारी): विधी विभागात आपल्या कामाप्रती असलेल्या समर्पण आणि योगदानाची दखल घेत आद्यश्री कांबे यांना नुकताच ‘सर्वोत्कृष्ट विदर्भ महिला २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महावितरणच्या विविध विभागांशी समन्वय साधताना त्यांना नेहमीच नवे आणि वेगळे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणने ९३ गुण मिळवून देशातील अव्वल कंपनीचा मान मिळवण्यात दामिनींचाही मोलाचा वाटा असल्याचे उपकार्यकारी अभियंता रूपा भारती यांनी नमूद केले. कल्पना भुले म्हणाल्या, व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या कल्पना भुले यांना व्यवस्थापनाने दिलेल्या संधीमुळे आयआयटी, पवईसारख्या नामांकित संस्थेसोबत आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयावर काम करण्याचा अनुभव मिळाला.