अमरावती : महावितरणच्या अमरावती जिल्ह्याअंतर्गत लोणी (टाकळी) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राने आयएसओ ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवून परिमंडळातील पहिले आयएसओ प्रमाणित उपकेंद्र बनण्याचा मान मिळवला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत उपकेंद्राच्या नोंदवहीत अभिप्रायाची नोंद करून उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतूक केले.
ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित वीज पुरवठा देण्यात ३३ केव्ही उपकेंद्रांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महावितरणच्या ३३ केव्ही लोणी (टाकळी) उपकेंद्रात सक्षमीकरण आणि नूतनीकरणाचे कार्य अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले गेले असून यामुळेच आयएसओ ९००१:२०१५ चे मानांकन मिळवता आले असल्याचे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.व्यवस्थापकीय संचालकांच्या या दौऱ्यात प्रादेशिक संचालक परेश भागवत, सौर कंपनीचे सल्लागार श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता अशोक साळुंके, राजेश नाईक, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता प्रफूल्ल लांडे, राजेश घाटोळे, प्रदीप अंधारे आदी उपस्थित होते.
वीज ही केवळ अत्यावश्यकच नव्हे, तर जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी शक्ती आहे. गुणवत्तापूर्ण आणि अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी उपकेंद्रांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आयएसओ ९००१:२०१५ या आंतरराष्ट्रीय दर्जा मानकानुसार ३३ केव्ही लोणी (टाकळी) उपकेंद्रात राबवण्यात आलेल्या तांत्रिक व्यवस्थापन पद्धतीमुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार आहे.लोणी उपकेंद्राच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या सहभागाचे त्यांनी विशेष उल्लेख करत परिमंडळातील “इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारून आपल्या क्षेत्रातील उपकेंद्रांना आयएसओ मानकाच्या धर्तीवर सुधारित करावे व आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही लोकेश चंद्र यांनी यावेळी केले.
महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. आयएसओ मानकानुसार उपकेंद्रात झालेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरीता होणार आहे. आयएसओ हे मानांकन गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी दिले जाते. महावितरणच्या उपकेंद्राला हे मानांकन मिळाल्याने, ते ग्राहकांना चांगली आणि दर्जेदार वीजपुरवठा सेवा देण्यासाठी बांधिल आहेत, असे मानले जाते.