यवतमाळ : जिल्ह्यातील यवतमाळ, आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, नेर-नबाबपूर आणि पांढरकवडा या १० नगरपालिकांमध्ये आणि ढाणकी नगरपंचायतीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व नगरपालिकांमध्ये आज सोमवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती बघायला मिळाली. गेल्या आठवड्यात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी कोणीही उत्सुक नसताना आज इच्छूक उमेदवारांची गर्दी अचानक वाढली. त्यामुळे सर्वच ठिकाणी दुपारी ३ वाजताची वेळ संपल्यानंतरही रांगेत असलेल्या उमदेवारांकडून रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याीच प्रक्रिया सुरू होती.

जिल्ह्यात कुठेच पूर्ण महायुती झाली नाही. तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीची घोषणा होवून महत्वाच्या यवतमाळ शहरातच अखेरच्या क्षणी आघाडीत बिघाडी झाली. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष कुठेच एकत्र आले नाहीत. यवतमाळमध्ये शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन पक्ष सोबत लढणार आहेत. भाजप स्वबळावर लढत आहे. यवतमाळात भाजपने ११ नगरसेवकांचा पत्ता कट केला. पुसदमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन पक्ष एकत्र लढणार होते. मात्र आज दुपारी त्यांची युती फिस्कटली. त्यामुळे येथेही तिन्ही सत्ताधारी पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. दारव्हा, दिग्रस येथेही महायुतीच्या चर्चा झाल्या, प्रत्यक्षात युती झाली नाही. नेर नगर परिषदेसाठी शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांची युती झाली. मात्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र लढणार आहे.  वणी, पांढरकवडा, आर्णी, घाटंजी येथेही महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत.  उमरखेड येथे भाजप आणि शिवसेना (शिंदे) काही जागांवर सोबत लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नगर पालिका असलेल्या  यवतमाळात नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. येथे काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाने पळविला. महाविकास आघाडीने १० नगर परिषदेत सोबत लढण्याचा निर्णय घेतला. मात्र आज यवतमाळ येथे महाविकास आघाडीत फूट पडली. शिवसेना (उबाठा) पक्षात आघाडीवरून मतभेद निर्माण झाले आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिले. ढाणकी नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात युती झाली. इतर पक्ष येथे स्वतंत्रपणे लढणार आहेत. वृत्त लिहिपर्यंत पुसद येथे नगराध्यक्ष पदासाठी २४, नगरसेवक पदासाठी २२६, वणी नगराध्यक्ष १०, नगरसेवक १८८, पांढरकवडा नगराध्यक्ष २०, नगरसेवक १७६, नेर नगराध्यक्ष सहा, नगरसेवक १६३, घाटंजी नगराध्यक्ष ११, नगरसेवक १०९, आर्णी नगराध्यक्ष २१, नगरसेवक १६५ आणि ढाणकी नगरपंचातीत नगराध्यक्ष पदासाठी १५ तर नगरसेवक पदासाठी १३३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, उमरखेड नगरपरिषदेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

यवतमाळात आजी-माजी आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरातील उमदेवार

सायंकाळपर्यंत यवतमाळ येथे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची कन्या ॲड. प्रियदर्शनी उईके, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून तेजस्विनी राजू चांदेकर, काँग्रेसकडून चित्ररेखा कुडमेथे, माधुरी मडावी आणि शेवटच्या क्षणी माजी आदिवासी विकास मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या स्नुषा प्रियंका जितेंद्र मोघे यांनी नामांकन दाखल केले. शिवसेना (उबाठा) कडून वैष्णवी नरेश कोवे यांनी तर वंचित बहुजन आघाडीकडून चंचल संतोष मसराम यांनी अर्ज दाखल केला आहे. पुसदमध्ये शेवटच्या क्षणी महायुती तुटली. येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) सोबत होते. मात्र ऐनवेळी विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहचारिणी मोहिनी इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून नगराध्यक्ष पदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून माजी नगरसेवक निखील चिद्दरवार यांनी नामांकन दाखल केले.