फर्निचर दुकानेही जळाली; कोटय़वधींची हानी

नागपूर : लकडगंज परिसरात गुरुवारी सकाळी लाकडाच्या १०  आरा गिरण्या (आरामशीन) व फर्निचर दुकानांना लागलेल्या भीषण आगीत कोटय़वधी रुपयाचे लाकूड व इतर साहित्य जळून राख झाले. आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन विभागाचे ११ बम्ब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मिळवण्यात विभागाला यश आले.

गुरुवारी सकाळी लकडगंज परिसरात हरिहर मंदिराजवळील लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आणि काही क्षणातच तिने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळवले. आग विझवण्यासाठी बंब येईपर्यंत आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचली. ज्या भागात ही घटना घडली तेथे १०० हून अधिक लाकडांचे आगार आहे. त्यामुळे आग पसरण्याची भीती होती. परंतु अग्निशमन विभागाच्या १०० पेक्षा कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली.

आगीत भगवती टिंबर, वैभवलक्ष्मी टर्निग, गजानन फर्निचर, योगेश ट्रेडर्स, दीपक मोल्डींग, अलंकार टिंबर मार्ट, एम.एस टिंबर मार्ट, अजय टिंबर मार्ट, भूषण कॉयर स्टोअर्स, महालक्ष्मी वूड वर्क इत्यादी दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यातील अनेक दुकानातील फर्निचर, संगणक आदी साहित्य जळाले. रोहित्रामध्ये (डीपी) शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. आरा गिरणीला लागून असलेल्या रोहित्रातून आग भडकली असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

आग प्रतिबंधक यंत्रणेचा अभाव

लकडगंज परिसरातील अग्निशमन यंत्रणा नसलेल्या आरा गिरण्यांना अग्निशमन विभागाने नोटीस दिल्या होत्या. यापैकीच अनेक आरा गिरण्या या घटनेत आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. काही आरा गिरण्यांकडे परवाना सुद्धा नव्हता. ज्यांनी अग्निशमन यंत्रणा लावलेली नव्हती अशा आरामशीनवर महापालिकेकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

रोहित्र हलवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

आरा गिरणीला लागून असलेले  रोहित्र (डीपी ) हलवण्याची मागणी व्यापाऱ्यांची होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आरगिरणी मालकांनी केला.