वर्धा : भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी समर्थकांचा शिरकाव, असा जाहीर आरोप करीत त्यापासून सतर्क राहण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचे खुले समर्थनही केले. त्यामुळे गांधीवादी परिवार अस्वस्थ झाला आहे. हे आरोप मागे घ्या किंवा पुरावे सादर करा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच या आरोपाचा तीव्र निषेध करीत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पाठविले.
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख गांधीवादी संस्थांनी भारतीय जनता पक्षाचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमीत वानखेडे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर गांधी विचारांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज (१६ जुलै २०२५) एक खुले पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि या विधानाच्या पार्श्वभूमीवर काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये संस्थांनी नमूद केले आहे की, माओवादी संबंधांच्या नावाखाली गांधीवादी संस्थांवर संशय घेणे हे केवळ निराधारच नव्हे, तर अपमानास्पदही आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे सत्यासाठी, अहिंसात्मक मार्गाने कार्य करणाऱ्या संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. जर आमदार सुमीत वानखेडे यांच्याकडे किंवा राज्य शासनाकडे कोणतेही ठोस पुरावे आहेत, तर त्यांनी ते त्वरित जनतेसमोर आणावेत, अन्यथा त्यांनी आपले विधान तात्काळ मागे घ्यावे”, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून दूर
गांधी संस्थांनी पत्रात ठामपणे म्हटले आहे की, “आम्ही कालही हुकूमशाहीच्या विरोधात उभे होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसक किंवा टोकाच्या विचारांपासून दूर आहोत, मग ती डावी असो वा उजवी विचारसरणी.
संस्थांनी पत्रात हेही स्पष्ट केलं आहे की, “कुठल्याही चौकशीस आम्ही पूर्ण सहकार्य करू. कारण आम्ही नेहमीच अहिंसा, सत्य आणि लोककल्याणाच्या मार्गावर चालत आलो आहोत. आमचं अस्तित्वच सत्ताधाऱ्यांना सतत अस्वस्थ करत असावं, अशी शंका येते.
या पत्रावर स्वाक्षरी केलेल्या प्रमुख गांधी विचार संस्थाचे प्रतिनिधी असे आहेत
-चंदन पाल – अध्यक्ष, सर्व सेवा संघ, सेवाग्राम
-आशा बोथरा – अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान
-डॉ. प्रभाकर पुसदकर – मंत्री, नई तालीम समिती, सेवाग्रा डॉ. विभा गुप्ता – अध्यक्ष, मगन संग्रहालय,वर्धा
-अॅड. अविनाश काकडे – मंत्री, सर्व सेवा संघ, सेवाग्राम
-अनिल फरसोले – मंत्री, गांधी सेवा संघ, सेवाग्राम
-रमेश दाने – अध्यक्ष, प्रदेश सर्वोदय मंडळ, महाराष्ट्र
-अतुल शर्मा – सदस्य, ग्राम सेवा मंडळ, वर्धा</p>
-सुदाम पवार – अध्यक्ष, किसान अधिकारअभियान, -डॉ. तारक काटे – अध्यक्ष, धरमित्र, गोपुरी,अशोक बंग अध्यक्ष चेतना विकास,किरण जाजू सहमंत्री -जमनालाल बजाज बालमंदीर,चिन्मय फुटाणे सचिव ग्राम सेवा मंडळ वर्धा,डॉ हेमचंद्र वैद्य प्रधानमंत्री राष्ट्रभाषा प्रचार समिती