नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात महापालिका प्रभाग रचनेत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघाती प्रभाग क्रमांक ३५ मध्ये शिवणगाव वस्ती येथून पुनर्वसन झाले यांचे पुनर्वसन चिंच भवन परिसरात झालेले आहे. परंतु त्यांच्या वस्तीचे म्हणजे शिवणगावचा समावेश प्रभाग क्रमांक ३८ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

नागपुरातील मल्टी मॉडेल कार्गोहब म्हणजे मिहान साठी शिवणगाव येथील भूमी संपादन करण्यात आलेली आहे. शिवणगाव वस्तीतील नागरिकांचे चिंचभवन परिसरातील जागेवर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. महापालिकेने आज प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत प्रभागाच्या सीमांकनात पुनर्वसन परिसर हा प्रभाग क्रमांक ३५ मध्ये आहे तर शिवणगाव लोकवस्तीचा समावेश शेजारच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये आहे. पुनर्वसन झाल्यानंतर शिवणगाव लोकवस्तीमध्ये मतदान केंद्रच उरलेले नाही. त्यामुळे शिवणगाव वस्तीतून स्थानांतरित होऊन चिंचभवन परिसरात पुनर्वसित झालेल्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक ३५ किंवा प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मतदान करावे याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही म्हणजे प्रभाग क्रमांक ३५ आणि प्रभाग क्रमांक ३८ येतात. यासंदर्भात माजी नगरसेवक आक्षेप घेणार असून पुनर्वसित लोकांनी नेमके कोणत्या भागात मतदान करावे हे स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणूकांचे प्रभाग रचनेचे प्रारुप वेळापत्रकानुसार शुक्रवारी रात्री जाहीर झाले. महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ४ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहे. प्रारुप जाहीर झाल्यानंतर आता तब्बल साडेतीन वर्षानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

शहरातील ३७ प्रभागात चार नगरसेवक, तर ३८ व्या प्रभाग ही तीन नगरसेवकांचा आहे. २०१७ च्या प्रभागरचनेत किरकोळ बदल सोडल्यास फारसे बदल नाहीत. प्रभाग रचनेचे प्रारुप शनिवारी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना सुरुवात होणार आहे. प्रभाग रचना करताना महापालिकेकडून सीमांकन नेमके कशाप्रकारे करण्यात आले, कोणते भाग कोणत्या प्रभागाला जोडण्यात किवा तोडण्यात आले आहे हे स्पष्ट झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. २०१७ नंतर निवडणूका होणार असल्याने त्यासाठी प्रभाग रचनेचे स्वरुप नागपूर महापालिकेकडून तयार करून राज्य सरकारला पाठवण्यात आले होते.