देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकारांत वाढ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा वेतनवाढीचा लाभ मिळवण्यासाठी शैक्षणिक अर्हता वाढावी म्हणून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांकडून या गैरप्रकाराला खतपाणी घातले जात असल्याचे निरीक्षण भरारी पथकांनी नोंदवले आहे.  

विद्यापीठाची अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नांदेड, नागपूर आणि पुणे ही आठ विभागीय केंद्रे आहे. नोकरी करीत असताना नियमित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येत नाही. अशावेळी नोकरदार वर्ग किंवा इतर व्यस्त असलेले व्यक्ती मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतात. मात्र, नोकरी करून परीक्षेचा अभ्यास करणारे कमीच. त्यामुळे गैरप्रकाराला मुबलक वातावरण असणाऱ्या परीक्षा केंद्रांची निवड परीक्षार्थीकडून केली जाते. सध्या तीनशे अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑफलाइन परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांचे केंद्र गैरप्रकारांचा अड्डा झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही भरारी पथकांनी छापे टाकले  असता त्यांना निदर्शनानुसार अनेक परीक्षा केंद्रांवर पुस्तक उघडून उत्तरे लिहण्याचा प्रकार सुरू आहे, तर काही ठिकाणी भ्रमणध्वनीमधून उत्तरे शोधली जात आहेत. काही केंद्रांवर खुद्द परीक्षकच उत्तरे सांगतात. असे असंख्य गैरप्रकार परीक्षेदरम्यान सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सुविधेनुसार दर

परीक्षा केंद्रावर ‘कॉपी’ करण्यासाठी मुभा हवी असल्यास परीक्षा केंद्रावर प्रति विद्यार्थी पाच ते सहा हजार रुपये गोळा केले जातात, तर ‘कॉपी’ करण्याच्या मुभा आणि महाविद्यालयाकडून तशी सुविधा हवी असल्यास दहा हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागते. तर परीक्षार्थ्यांच्या नावावर दुसऱ्या कुठल्या विद्यार्थ्यांला परीक्षेला बसवायचे असेल तर दुप्पट रक्कम मोजावी लागते. परीक्षेत ‘कॉपी’ करण्यासाठी पाच हजार, परीक्षा केंद्राकडून उत्तरे हवी असल्यास दहा हजार तर परीक्षार्थीच्या जागेवर दुसऱ्या कुणाला बसवायचे असेल तर दुप्पट पैसे, असे दरपत्रकच परीक्षा केंद्रांनी ठरवून दिले आहेत. त्यामुळे मुक्त विद्यापीठ म्हणजे पैसे देऊन उत्तीर्ण होण्याचे केंद्र बनत असल्याची चिंता शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

उत्तीर्ण करण्याच्या हमीवर प्रवेश

नागपुरातील सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर दोन दिवसांआधी एक असाच प्रकार समोर आला. या केंद्रावर नियमानुसार परीक्षा घेतली जाते. मात्र, या केंद्रावर शासकीय सेवेत असणारी एक विद्यार्थिनी परीक्षेसाठी आली. तिला गैरप्रकार करण्यापासून रोखले असता तिने अधिकचे पैसे देऊन परीक्षा उत्तीर्ण करून देण्याच्या हमीवर प्रवेश घेतल्याची माहिती दिली. यावर भरारी पथकाने योग्य ती कारवाई केली असली तरी असे प्रकार बहुतांश केंद्रांवर सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरही असाच काहीसा प्रकार उघड झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी आम्ही कठोर पाऊल उचलले असून भरारी पथकही वाढवले आहेत. – डॉ. सुधाकर इंगळे, संचालक, विभागीय केंद्र नागपूर.