आरोपीच्या वकिलांच्या पुढाकाराने समेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सबळ पुराव्याअभावी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली. मात्र, आरोपीने सुटका होताच पीडित मुलीशी विवाह केला. ही सुखद धक्का देणारी घटना नागपुरात घडली आहे.

गोपीचंद विश्वंभर शाहु (२४) असे निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपीचंदचे परिसरातीलच एका मुलीवर प्रेम होते. ती मुलगीही त्याच्यावर प्रेम करीत होती. मात्र, दरम्यान १० फेब्रुवारी २०१३ ला गोपीचंद आणि त्याचा मित्र अविनाश बोरकर आणि त्यांच्या दोन मैत्रिणी असे चौघेजण घरातून निघून गेले. या प्रकरणात मुलीच्या आईने कोराडी पोलिसांत मुलगी हरविल्याची तक्रार दिली. त्यावेळी सर्वजण हे हैदराबादला होते.

जवळपास तीन आठवडे ते तिथे होते. इकडे तिच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा अपहरणाचा गुन्हा नोंदविला आणि आरोपींना अटक केली. या प्रकरणात दोन मुलींची सुटका करण्यात आली. घटनेची वेळी पीडित मुलगी सोळा वर्षांची होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्य़ांमध्ये दोन्ही आरोपी जवळपास तीन महिने कारागृहात होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचे विशेष न्यायाधीश व्ही. सी. बरडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणाची सुनावणी सुरू असताना अविनाश बोरकर आणि त्याच्या मैत्रिणीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे गोपीचंदविरुद्ध खटला चालविण्यात आला.

सर्व साक्षीपुरावे तपासण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाला आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. के. टी. घुगुसकर आणि राज्य सरकारतर्फे सरकारी वकील विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.

दोन्ही कुटुंबांची सहमती

प्रकरणाचा निकाल लागताच वकिलाच्या पुढाकाराने दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडविण्यात आली. १६ सप्टेंबरला निकाल लागताच १८ सप्टेंबरला एका मंदिरात दोघांचाही विवाह लावून देण्यात आला. आरोपी हा टाईल्सचा उद्योग करीत असून मुलगी ही शिक्षण घेत आहे, अशी माहिती अ‍ॅड. घुगुसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man married girl after court acquits from rape case
First published on: 24-09-2016 at 02:22 IST