Manoj Jarange Patil Maratha Reservation: नागपूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच न्याय्य, कायदेशीर भूमिका घेतली असताना, मुंबईत उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरुद्ध द्वेष पसरविण्याचा डाव रचत आहेत.

शरद पवार व उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर मुंबईत उपोषण आदोलनाच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा राजकीय प्रयोग सुरू केल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देतांना जयदीप कवाडे म्हणाले की, राज्याच्या जनतेला वेठीस धरून मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकीय सौदेबाजी करण्याचा प्रयत्न आज मुंबईत होत आहे. मात्र सत्य हे आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनेत मराठा समाजासाठी न्यायालयात टिकेल असे ठोस व कायदेशीर आरक्षण दिले आहे. उपोषणकर्ते हे मराठा समाजाचे खरे प्रतिनिधी नसून ते केवळ शरद पवारांच्या राजकीय डावाचे प्यादे आहेत.

आंदोलक समाजाच्या भावनांचा वापर करून दिशाभूल करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात तग धरणारे आरक्षण देण्यासाठी सातत्याने लढा दिला. त्यांनी मराठा समाजाशी कधीही अन्याय केलेला नाही. उलट समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आरक्षण कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलनकर्ते हे देवेंद्र फडणवीसांविरोधात खोटे प्रचार करीत असून, त्यातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

मराठा समाजातील युवकांना रोजगार, शिक्षण आणि प्रगतीच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार गंभीर आहे. मात्र, आंदोलनकर्ते उपोषण आणि अशांततेचे वातावरण निर्माण करून समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांचे ध्येय समाजाची प्रगती नसून स्वतःची राजकीय पोळी भाजणे आहे. यामागे शरद पवार व उद्धव ठाकरेंचा थेट आशीर्वाद आहे. पवार हे मुद्दाम मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करू पाहत आहेत. कवाडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, फडणवीस यांनी केलेले आरक्षण हे समाजाला खरोखर लाभदायक ठरेल, कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. मात्र उपोषणकर्त्यांनी केलेली मागणी ही अवास्तव, कायदेशीर दृष्ट्या अशक्य आणि समाजात मतभेद निर्माण करणारी आहे. ते स्वतः आंदोलनाच्या नावाखाली राजकारणाचा खेळ मांडत आहेत.

अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करणे हे घातक आहे. आंदोलनात शरद पवार व उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप ही राजकीय नौटंकी असून दोन्ही नेत्यांची छुपी योजना दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणूकीत आपला फायदा करून घेण्याचा मानस यात दिसून येत आहे. शरद पवार हे चाणक्य नेते असून त्यांना आरक्षणाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, हे उत्तमरीत्या ठाऊक आहे. पण तरीही ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे जाणूनबुजून मराठा समाजाला उचकावत आहेत. कारण त्यांना राजकारणासाठी समाजाला वेठीस धरण्याची सवय आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.