डॉ. आशिष देशमुख यांचा दावा; मोर्चाला मुख्यमंत्री सामोरे जाणार नाहीत

सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी नागपुरात मराठा-कुणबी मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात विधानसभा व विधान परिषदेतील विविध पक्षाचे ७५ हून जास्त आमदार सहभागी  होतील, असा दावा भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी विधानभवन परिसरात लोकसत्ताशी बोलतांना केला.

मराठा मोर्चात आमदारांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन शहरातील सकल मराठा समाजाच्या एका सभागृहात सर्वपक्षीय आमदारांची एक बैठक घेतली होती. त्यात विविध पक्षांच्या काही आजी व माजी आमदारांसह मंत्र्यांनीही सहभाग नोंदवला होता.

आमदार देशमुख म्हणाले की, मराठा समाजाकडून आरक्षणाची न्याय मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या आंदोलनातून ती शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न आहे. कोपर्डीतील आरोपींना कठोर शिक्षासह मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांकरिता राज्यभरात मराठा समाजाने मोर्चे काढले. नागपूरला कुणबी शब्दावरून आयोजकात फाटाफूट झाली. त्यामुळे एका गटाचा मोर्चा आधीही निघाला आहे. या मोर्चात अपेक्षेप्रमाणे मराठय़ांची गर्दी झाली नाही. त्यातच दुसऱ्या गटाने सकल मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाच्या नावाने १४ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा आयोजित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला सामोरे न जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र मोर्चेकऱ्यांची इच्छा असल्यास शिष्टमंडळाने विधानभवनात येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घ्यावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.