अमरावती : जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात या ठिकाणाचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन करावे, ही मागणी अनेक वर्षांपासून करण्‍यात येत होती. ती अखेर पूर्ण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला, ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. चांदूर बाजारपासून मोर्शी मार्गावर नऊ किलोमीटरवर रिद्धपूर आहे. महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली. महानुभाव पंथाचे नागदेवाचार्य, म्हाइंभट्ट, केशिराज व्यास, महदाईसा यांनी पंथाचा विचार पुढे नेला. त्याचदरम्यान लीळाचरित्र, सिद्धांतसुत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय-ग्रंथ अशी महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा निर्माण झाली. आद्य कवयित्री महदाईसांनी येथे धवळे रचले. शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही येथेच रचल्या. मराठीची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रिद्धपूरला खऱ्या अर्थाने मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना व्‍हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्‍यात येत होती.

हेही वाचा – अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक; मरणोत्‍तर नेत्रदानाचा घेतला निर्णय

मराठी भाषेची सद्य:स्थिती, मराठी भाषाविषयक धोरणाची उद्दिष्टे यावर भाषेचे २५ वर्षांचे धोरण निश्चित करण्याचे प्रयत्‍न काही वर्षांपूर्वी शासन स्तरावरून सुरू करण्‍यात आले होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने मराठी भाषा विकासाचे धोरण (मसुदा २०१४) राज्यासमोर ठेवले. २५ वर्षांसाठी मराठी भाषेचे धोरण निश्चित करताना मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे प्रस्तावित मसुद्यात नमूद करण्‍यात आले होते. हिंदी भाषेचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची निर्मिती करण्‍यात आली. सरकारने रामटेक येथे संस्कृत भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांत त्या-त्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना झाली. त्‍याच प्रकारे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती.

हेही वाचा – नागपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना १९३३ साली नागपुरात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आली. त्यानंतर विविध साहित्‍य संमेलनातही हे विद्यापीठ स्थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. आता अर्थसंकल्‍पात ही घोषणा करण्‍यात आल्‍याने साहित्‍यप्रेमींनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language university will be established at riddhpur in amravati district mma 73 ssb
First published on: 09-03-2023 at 16:35 IST