बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बहुचर्चित मशाल यात्रेला आज गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी मोताळा येथून प्रारंभ झाला. सतरा दिवसांत तब्बल १५१ गावांतून ही यात्रा जाणार आहे. यात्रेच्या समारोपात २३ सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आज मोताळा येथून या मशाल यात्रेला थाटात प्रारंभ झाला. ढोलताशांचा गजर, गगनभेदी घोषणा, फडकणारे भगवे ध्वज, सळसळत्या उत्साहात सहभागी युवा शिवसैनिक, नेत्यांची आक्रमक भाषणे, असा यात्रेचा थाट होता. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत संदीप शेळके, लखन गाडेकर, वासुदेव बंडे, शुभम घोंगटे, मोहम्मद सोफियान, अशोक गव्हाणे, भागवत शिकरे, विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, गणेश पालकर, गुलाब व्यवहारे,किरण हुंबड, आशिष खरात,सुधाकर सुरडकर, संजय गवते, रामदास सपकाळ प्रामुख्याने सहभागी झाले. हेही वाचा >>> संतनगरी शेगावात गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातचरणी गहाण’ प्रारंभी यात्रेची रूपरेषा सांगितल्यावर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढविला. महायुती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात आहे, युवकांचा रोजगार हिरावला जात आहे. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र राज्यात होत आहे. आया-भगिनी असुरक्षित आहेत, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या सरकारला कशाचेच सोयरसुतक नाही, त्यांना फक्त सत्ता वाचवायची आहे. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत जनताजनार्दन महायुतीला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी बोलून दाखविला. हेही वाचा >>> “…तरी विरोधक देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतील”, सुधीर मुनगंटीवार यांची टीका यात्रेची रूपरेषा अशी.. मशाल येणार, समस्यांचा अंधकार मिटवणार या 'टॅगलाईन' सह मशाल जागर यात्रेसाठी शिवसेनेच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात पोहोचून शेतकरी, बेरोजगार, पशुपालकांच्या व्यथा समजून घेण्यात येणार आहे. एक आवाजी हुकूमशाही बंद करण्यासाठी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मशाल यात्रा काढण्यात येत असल्याचे तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी यावेळी सांगितले. यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमुक्ती, सोयाबीनला किमान ८ व कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा रक्कम द्यावी, शेतीला २४ तास वीज पुरवठा करावा, नादुरुस्त रोहित्र (डीपी) तात्काळ कार्यान्वित करा, शेतकऱ्यांची थकीत नुकसान भरपाई तात्काळ द्यावी यासह अन्य मागण्यांच्या संदर्भात मशाल यात्रा गावागावात जाऊन जनजागृती करणार आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व मायबाप जनतेने एकजूट होऊन सत्ता व धनशक्तीला जनशक्तीची ताकद दाखवण्यासाठी २३ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.