वर्धा:  ऐतिहासिक वारसा जपत अद्यापही आपल्या कार्याने विश्वात डंका असणाऱ्या संस्था अस्तित्वात आहेत. जुने जावू द्या मरणा लागूनी,,,, असे म्हणतात. पण काही संस्थांची थोरवीच अशी असते की त्यांच्याबाबत या संस्था जपल्या पाहिजेत असे सर्वदा म्हटल्या जाते. केंब्रिज, ऑक्सफोर्ड अश्या काही संस्थांची नावे दिल्या जातात. त्याच तोडीची एक प्रकाशन संस्था आहे. ती संस्था म्हणजे अमेरिकेतील मॅकग्रा हिल ही संस्था आहे.

या संस्थेस १३० वर्षाचा इतिहास आहे. भारतात या संस्थेचे कार्य ५५ वर्षांपासून सूरू आहे. जगातील तीन मोठ्या प्रकाशन संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेतर्फे वैद्यकीय शिक्षणावरील क्रमिक पुस्तके प्रकाशित होत असतात. जगभरातील वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक मंडळी या संस्थेची पुस्तके सर्वोत्तम म्हणून स्वीकारतात. वैद्यकीय शिक्षणचे प्रकाशनातील वैश्विक नेतृत्व करणारी ही संस्था संबंधित सामुग्री पण तयार करते. मॅकग्रा ऑनलाईन पायलट वैद्यकीय शिक्षण व्यासपीठ उपलब्ध आहे. अद्यावत क्लिनिकल संसाधने सामायिक करणे तसेच जागतिक प्रकाशकांच्या सल्लागार मंडळात सहभागी होणे, हा उद्देश ठेवून येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ मॅकग्रासोबत जुळले आहे. मॅकग्रा व हे विद्यापीठ मिळून विद्यापीठात मॅकग्रा हिल सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यरत झाले आहे. तसा अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हे असे पहिलेच आंतरराष्ट्रीय केंद्र ठरणार आहे.

या सेंटरचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कुलपती दत्ता मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधिनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. माजी खासदार रामदास तडस, विद्यापीठ सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, मॅकग्राच्या उपाध्यक्ष आमंडा पेक, एलोनर पाईक, क्लिनिकल लर्निंगचे डॉ. रिम झकारिया, प्र कुलगुरू गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे, मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव तसेच विद्यापीठाचे डॉ. जहिरुद्दीन  काझी, डॉ. तृप्ती वाघमारे व डॉ. सोनाली चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. हॅरिसन्स टेक्स्ट बुक ऑफ मेडिसिनच्या २२ व्या आवृत्तीचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले. कुलपती दत्ता मेघे म्हणाले की विविध उपक्रमास ईथे नेहमीच चालना देण्यात येते. हे विद्यापीठ जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मंत्री डॉ. भोयर यांनी सर्व ते सहकार्य करण्याची हमी दिली.