औषध खरेदीतील ५ हजारांच्या सीमा निश्चितीचा फटका

औषध खरेदीतील सीमेमुळे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रोज सुमारे १० शस्त्रक्रिया नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे थांबले आहे. रुग्णांकरिता आवश्यक औषध व सर्जिकल साहित्याच्या खरेदीची सीमा सुमारे ५ हजार निश्चित झाल्याने हा प्रकार घडत असून त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला आहे. मध्य भारतात रक्तधमन्यातील अडथळे दूर करण्यासह हाडांशी संबंधित विविध प्रत्यारोपणाचे उपचार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या एकच शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे, हे विशेष.

महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्णांना दिलासा देण्याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सुरू केली. योजने अंतर्गत राज्यातील प्रतिकुटुंब ठरावीक राशी विमा कंपनीकडे शासनाकडून भरण्यात आली. पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रथम राज्यातील आठ जिल्ह्य़ात व त्यानंतर सर्वत्र या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. योजने अंतर्गत ९७२ प्रकारच्या आजारांच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार बीपीएल व एपीएल वर्गातील कुटुंबाला शासकीय व योजनेतील खासगी रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहे. उपचाराकरिता प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांपर्यंत व मूत्रपिंड प्रत्यारोपणापर्यंत २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलत आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे मध्य भारतातील सर्वाधिक शस्त्रक्रिया या योजने अंतर्गत होत असून रोज पन्नासावर शस्त्रक्रिया येथे नोंदवल्या जातात. मध्य भारतातील शासकीय रुग्णालयांपैकी केवळ मेडिकलमध्येच हाडांचे प्रत्यारोपण व रक्तधमन्यातील अडथळ्यांवर उपचार होतात. या शस्त्रक्रिया वा उपचाराकरिता मेडिकल प्रशासनाला महागडय़ा औषधांसह स्टेन व विविध सर्जिकल साहित्यांची गरज भासते. नुकतेच मेडिकलमधील राजीव गांधी जीवनदायी योजनेचे अंकेक्षण संबंधित विभागाकडून झाले.

अहवालात ५ हजार रुपयांवर औषधांसह सर्जिकल साहित्यांची स्थानिक खरेदी न करण्यासह रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे प्रमुख जिल्हाधिकारी असल्याने त्यांनी स्थानिक खरेदी ५ हजारावर न करण्याच्या मेडिकल प्रशासनाला सूचना केल्या. तेव्हा येथील रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्याची प्रक्रिया, हाडांच्या प्रत्यारोपणाची प्रक्रिया, पक्षाघातसदृश्य असलेल्या जीबीएस सिंड्रमवरील उपचाराच्या प्रक्रिया, बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्याची धक्कादायक माहिती आहे.

या प्रक्रियांकरिता लागणारे स्टेन, औषधांसह विविध सर्जिकल साहित्य हे पाच हजारांहून जास्त किमतीचे असल्याने हा प्रकार होत आहे. तेव्हा या शस्त्रक्रिया थांबलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच काही शस्त्रक्रियांचे साहित्य उपलब्ध असून ते संपल्यावर त्याही शस्त्रक्रिया थांबण्याचा धोका आहे.

लवकरच प्रश्न सुटेल

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांच्या औषधांसह सर्जिकल साहित्यांची स्थानिक खरेदी ५ हजारांवर करण्याची परवानगी नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असून त्याकरिता विविध महागडय़ा औषधांसह सर्जिकल साहित्यांचे कंत्राट काढून ते जास्त प्रमाणात खरेदी केले जाईल, परंतु या प्रक्रियेला काही अवधी लागेल. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल