अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने आयोजित केलेल्या आनंद सोहळ्यावर निषेध आंदोलनाचे सावट पसरले आहे. सत्तारूढ आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ही वाघांसाठी वरदान ठरत असली, तरी येथील आदिवासी जनतेसाठी तो एक शाप ठरत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेनंतर हळूहळू त्याचा विस्तार करण्यात आला. मेळघाटमधील मोठ्या भौगोलिक क्षेत्रात व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती आहे. जाचक नियम आणि अटींमुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना तोड द्यावे लागते. मेळघाटातील अनेक रस्ते, पुलांच्या कामांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे रस्ते, पुलाचे प्रस्ताव रखडले आहेत. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण होऊन मेळघाटात आरोग्य सुविधा पुरविण्यात देखील अडचणी येत आहेत.
मेळघाटात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचा प्रश्न आहे. येथील जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहचू शकत नाहीत. अनेक खेड्यांमध्ये वीज पोहचलेली नाही. वीज वितरणाचे प्रस्ताव व्याघ्र प्रकल्पाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मेळघाटातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पाणी पुरवठा योजनांना व्याघ्र प्रकल्पाद्वारे परवानगी मिळत नसल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, या समस्या राजकुमार पटेल यांनी मांडल्या आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन अन्यत्र करण्यात आले. पण, तेथील नागरिकांना अजूनही नियमानुसार घरांचे मूल्यांकन, रस्ते, पिण्याची पाणी आणि इतर मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा – अमरावतीत दिसला ‘तपकीरी छातीचा माशीमार’ पक्षी
वन गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये अनेकांना अडकवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये व्याघ्र प्रकल्पाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. या मागण्यांची दखल न घेतल्यास व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेच्या ५० वर्षपूती सोहळ्याच्या आयोजनस्थळी निषेध आंदोलन केले जाणार असून, या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपली आणि व्याघ्र प्रकल्प प्रशासनाची राहील, असेही राजकुमार पटेल यांनी स्पष्ट केले आहे.