नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला भेट दिली होती. हे महाविद्यालय उभारण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. सध्या सरन्यायाधीशांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई हे या संस्थेचे सदस्य सचिव आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून संस्थेमध्ये वाद उफाडला असून या विरोधात राजेंद्र गवई यांनी बंडाचे पाऊल उचलले आहे.
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या मानसिक छळ प्रकरणाने आता नवीन रंग घेतला आहे. आरोपींवर कारवाई करण्यापेक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरई ससाई यांच्या आदेशाने पीडित प्राध्यापिकेला कारणे दाखवा आणि निलंबन करण्याची नोटीस बजावली. याउलट आरोपींना संरक्षण दिले. त्यामुळे महाविद्यालयात सुरू असलेल्या संपूर्ण गोंधळाला अध्यक्ष ससाई जबाबदार असून आमच्याकडे बहुमत असल्याने न्यायालयात जाऊन अध्यक्षांवर अविश्वास आणू, असा इशारा स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांनी दिला. प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भदंत ससाई हे धर्मगुरू आहे. समाजामध्ये त्यांना मान आहे. त्यामुळे त्यांचा आदर राखून आम्ही आजपर्यंत कधीही त्यांच्याविरोधात शब्दही काढला नाही. पुढेही ते सन्मानाने पद भूषवणार असल्यास आमचा विरोध नाही. मात्र, आता कर्मचारी आणि प्राध्यापकांना त्रास होत असून संस्थेमधील वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्ष पदावरून पायउतार करण्याशिवाय पर्याय नाही, असे गजघाटे म्हणाले. सुधीर फुलझेले हे पुन्हा सचिव पदावर कायम राहण्यास इच्छुक असल्यास आमचा कुणाचाही विरोध नाही. मी स्वत: हे पद सोडून त्यांना द्यायला तयार आहे. मात्र, त्यांनी पारदर्शी कारभार ठेवावा एवढीच आमची अट असल्याचेही डॉ. गवई म्हणाले.
मेंढेची खासगी सचिव म्हणून नियुक्ती गैर?
डॉ. आंबेडकर महाविद्यालयामधील डॉ. अरुण जोसेफ आणि स्मारक समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक रवी मेंढे यांच्याविरोधात प्राध्यापिकेने मानसिक छळाची तक्रार दिली आहे. मात्र, अध्यक्ष भदंत ससाई यांनी दोन वर्षांपूर्वी मेंढे यांची महाविद्यालयाच्या विविध कार्यालयीन कामांसाठी खासगी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. यावरही समितीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. अशी नियुक्ती करणे गैर असून यासंदर्भात समितीची कुठलीही बैठक झालेली नाही, असाही आरोप केला.
समाजातील लोकांना डावलल्याचा आरोप
दीक्षाभूमी ही बौद्ध अनुयायांचे पवित्र स्थान असताना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विशेष सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. समितीच्या सदस्यांनाही प्रवेशास ते मज्जाव करतात. हा प्रकार योग्य नाही. तसेच २२ कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही रवी मेंढे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. बौद्ध समाजातील लोकांची ही संस्था असतानाही अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कुठलीही सूचना न देता त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याचा आरोपही गवई आणि गजघाटे यांनी केला.